कत्तलीसाठी जाणार्‍या ३० गोवंशांची सुटका

नवाटोलाजवळ एलसीबीची कारवाई: १२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-news कत्तलीच्या उद्देशाने ३० गोवंशीय जनावरांना वाहनात दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार सालेकसा तालुक्यातील नवाटोला गावाजवळ उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आयशर वाहनासह ३० गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत वाहन, मोटारसायकल व जनावरे असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
gondia-news
 
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना, दरेकसा-सालेकसा मार्गाने गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नवाटोला गावाबाहेर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, दरेकसाकडून सालेकसाच्या दिशेने एक आयशर वाहन आणि त्याच्या मागे मोटारसायकल येताना दिसली. पोलिसांना पाहताच मोटारसायकल चालक वाहन सोडून जंगलाच्या दिशेने पसार झाला. पोलिसांनी आयशर वाहनाची तपासणी केली असता, त्यात ३० गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून व निर्दयतेने बांधून नेली जात असल्याचे आढळले.
 
 
पोलिसांनी २ लाख १० हजार रुपये किमतीची जनावरे, १० लाख रुपये किमतीचे आयशर वाहन आणि ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात महबूब आशीक खान (३९) रा. पार्वतीनगर, नागपूर, शारीख कुतरताल्ल खान (३५) रा. मूर्तिजापूर, जि. अकोला, वाहनमालक रऊफ खान रा. अमरावती, गोवंश पुरवठादार विजय उर्फ छोटू हटले रा. पानगाव, ता. सालेकसा आणि मोटारसायकल चालक अशा पाच जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, सोमेंद्रसिंग तुरकर, भोजराज बहेकार तसेच पोलिस शिपाई छगन विठ्ठले व निलेश ठाकरे यांनी केली.