नवी दिल्ली,
harry-brook २०२७ मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २० व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे. स्पर्धेतील सर्व १० संघांनी कायम ठेवलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या लिलावासाठी तब्बल १ हजार २२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या सर्व खेळाडूंची नावे फ्रँचायझींना पाठवण्यात येणार असून, संघांच्या पसंतीनंतर अंतिम यादी ४ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला लिलावात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार हॅरी ब्रुकला बीसीसीआयच्या नियमांमुळे लिलावापासून दूर राहावे लागणार आहे.

स्टोक्स आणि ब्रुक यांच्या बाबतीत बीसीसीआयचे वेगवेगळे नियम लागू झाले आहेत. परदेशी खेळाडूंनी मुख्य लिलावासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. एखाद्या खेळाडूने नोंदणी केली नाही, तर त्याला पुढील वर्षीच्या लिलावात सहभागी होता येत नाही. बेन स्टोक्स याला याच नियमाचा फटका बसला होता. त्यामुळे तो २०२६ च्या मिनी लिलावात सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, आता त्याने नोंदणी केल्याने २०२७ च्या लिलावासाठी त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुसरीकडे, हॅरी ब्रुकला दोन हंगामांच्या बंदीला सामोरे जावे लागत आहे. एखाद्या परदेशी खेळाडूने लिलावात नोंदणी करून फ्रँचायझीकडून निवड झाल्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी माघार घेतल्यास त्याच्यावर दोन हंगामांसाठी आयपीएलमध्ये खेळण्यास आणि लिलावात सहभागी होण्यास बंदी घालण्याचा नियम आहे. २०२५ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ब्रुकला ६.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले होते. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने माघार घेतली. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला दोन हंगामांच्या बंदीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, २०२७ च्या हंगामानंतरच तो पुन्हा लिलावासाठी पात्र ठरणार आहे.
बीसीसीआयने या नियमातून केवळ दुखापतग्रस्त खेळाडूंना सवलत दिली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे एखाद्या परदेशी खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता आले नाही आणि संबंधित फ्रँचायझीने त्याला संघातून मुक्त केले, तर त्याला पुढील हंगामाच्या लिलावात सहभागी होता येते. दरम्यान, २०२७ च्या आयपीएल लिलावासाठी नोंदणी करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५३ खेळाडू आहेत. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेच्या ४० खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत.