नवी दिल्ली,
khawaja-hurt-by-cumminss-statement २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या चेंडूशी छेडछाड प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 'सँडपेपरगेट' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याने आपल्या आत्मचरित्रातून काही दावे केले होते. या घटनेची माहिती ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंना होती, असे त्याने म्हटले होते. त्याच्या या विधानावर विद्यमान कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने तीव्र नाराजी व्यक्त करत ख्वाजाचे दावे पूर्णपणे निरर्थक असल्याचे म्हटले होते. आता कमिन्सच्या प्रतिक्रियेवर ख्वाजाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, त्याच्या वक्तव्यामुळे आपण भावनिकदृष्ट्या दुखावलो गेल्याचे सांगितले आहे.

उस्मान ख्वाजाने 'पेशन्स' या आत्मचरित्रात सँडपेपरगेट प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यानंतर कमिन्सने पत्रकार परिषद घेऊन त्याच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. कमिन्सने ज्या पद्धतीने आपल्यावर टीका केली, त्याची अपेक्षा नव्हती, असे ख्वाजाने म्हटले आहे. 'द ग्रेड क्रिकेटर' या पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने कमिन्सबद्दलची नाराजी व्यक्त केली. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून आपण नेहमीच कमिन्सचा आदर केला आहे. मात्र, त्याने सार्वजनिकरीत्या आपल्यावर अशा प्रकारे वैयक्तिक टीका करणे अनपेक्षित होते, असे ख्वाजाने सांगितले.
कमिन्सच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांमुळे आपल्याला मोठा मानसिक धक्का बसल्याचेही ख्वाजाने स्पष्ट केले. त्याच्या बोलण्याची पद्धत आणि त्याने घेतलेली भूमिका पाहून आपण निराश झालो होतो. पत्रकार परिषद पाहताना पत्नी रेचेलदेखील शेजारी होती. ती वारंवार आपली विचारपूस करत होती; मात्र त्या क्षणी आपण भावनांनी इतके भारावून गेलो होतो की, तिला उत्तर देणेही कठीण झाले होते, असा अनुभव ख्वाजाने सांगितला.
मात्र, या संपूर्ण वादामुळे कमिन्सबद्दलचा आपला आदर कमी झालेला नाही, असेही त्याने स्पष्ट केले. कमिन्सबद्दल मनात आजही प्रेम असून, केवळ एका पत्रकार परिषदेतील वक्तव्यांवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरवणार नसल्याचे ख्वाजाने म्हटले. आपण द्वेष करणारी व्यक्ती नसून, कमिन्ससोबतचे संबंध बिघडावेत अशी आपली इच्छा नसल्याचेही त्याने सांगितले.
या प्रकरणावरून दोघांमध्ये दरी निर्माण होण्याऐवजी सामंजस्याचा मार्ग निघावा, अशी ख्वाजाची अपेक्षा होती. पत्रकार परिषदेच्या काही दिवस आधीच आपण कमिन्सला संदेश पाठवला होता. सर्वांमध्ये मतभेद वाढवण्यापेक्षा तोडगा काढण्यासाठी कमिन्स पुढाकार घेईल, असे वाटले होते, असेही त्याने नमूद केले.
दरम्यान, या वादावर बोलताना ख्वाजाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. हा विषय हाताळण्याची जबाबदारी कमिन्सपेक्षा क्रिकेट ऑस्ट्रेलियाची होती, असे त्याचे मत आहे. कमिन्सने पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याऐवजी क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच पुढाकार घेऊन या प्रकरणावर तोडगा काढायला हवा होता, असे ख्वाजाने सांगितले. या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र मंच स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती आठवड्याच्या अखेरीस जाहीर होण्याची अपेक्षा आहे.