मुंडन करून कस्तुरबा प्रशासनाचा निषेध

ठिय्या आंदोलनाचा सहावा दिवस

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
वर्धा,
sixth-day-of-the-sit-in-protest कस्तुरबा हेल्थ सोसायटी तसेच अंतर्गत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक व आर्थिक मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड प्रणित कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा बुधवारी सहावा दिवस होता. मात्र, ६ दिवस उलटूनही संस्थेच्या व्यवस्थापनाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने व्यवस्थापनाचा निषेध करीत रोहित मेश्राम व अमोल कर यांनी मुंडन करून आपला संताप व्यक्त केला. तसेच २७ नोव्हेंबरपासून कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष तुषार उमाळे यांनी दिला.
 
 
sixth-day-of-the-sit-in-protest
 
संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या व्यवस्थापनाला तब्बल ८२७ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरींसह ७ प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. पीएफ/सीपीएफ कपात पूर्ववत सुरू करणे, सर्व कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (एचआरए) लागू करून थकबाकी अदा करणे, प्रोबेशन व कन्फर्मेशनमधील अनियमितता दूर करावी, सार्वजनिक सुट्यांचा लाभ देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, सेवा पुस्तिकांच्या प्रमाणित प्रती देणे आणि टाईम बाऊंड प्रमोशनमधील अनियमितता दूर करून प्रलंबित लाभ मंजूर करणे या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
 
या मागण्यांवर ३० ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही व्यवस्थापनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आज सहावा दिवस असूनही व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. संस्थेचे व्यवस्थापन वारंवार आम्ही चॅरिटेबल ट्रस्ट आहोत, स्वायत्त संस्था आहोत, त्यामुळे आम्हाला शासनाचे कायदे लागू होत नाही, अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. कोणतीही संस्था स्वायत्त असली तरी ती देशाच्या संविधानाच्या आणि संबंधित लागू कायद्यांच्या चौकटीतच कार्यरत असली पाहिजे. स्वायत्ततेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार कोणत्याही व्यवस्थापनाला नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
 
 
दरम्यान, संस्थेच्या व्यवस्थापनाला आता अंतिम मुदत देण्यात आली असून २६ नोव्हेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा २७ नोव्हेंबर पासून संघटनेच्या वतीने कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.