मुंबई
Ashok Saraf मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विनोदी असो वा गंभीर, प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाची वेगळी छाप देणाऱ्या अशोक सराफ यांच्यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांचेही नाव मराठी मनोरंजनविश्वात आदराने घेतले जाते. या दोघांनीही आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयशैलीविषयी भाष्य केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्याला अभिनयाच्या बाबतीत फॉलो केल्याचे सांगतानाच, त्यांनी विनोदी भूमिकांपलीकडे फारशी विविधता दाखवली नसल्याची खंतही व्यक्त केली.
अशोक सराफ यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयप्रवासाचा आढावा घेतला. त्यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, लक्ष्मीकांत बेर्डे हे अत्यंत गुणी कलाकार होते. कोणतीही चित्रपट किंवा नाटकाची पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर मनोरंजनविश्वात स्थान निर्माण केले. त्यांच्या कुटुंबातही अभिनय क्षेत्रातील कोणती मोठी व्यक्ती नव्हती किंवा त्यांना सुरुवातीपासून कोणाचा आधार मिळाला नव्हता. अगदी छोट्या भूमिका करत त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मोठे यश मिळवले. कोणताही पाठिंबा नसताना इतकी मोठी मजल मारणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयशैलीबाबत बोलताना अशोक सराफ यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. लक्ष्मीकांत यांनी साकारलेल्या भूमिका बारकाईने पाहिल्यास त्यांच्या अभिनयावर आपला प्रभाव दिसून येतो, असे ते म्हणाले. “त्याने मला थेट फॉलो केले. अर्थात, त्याची अभिनयाची शैली वेगळी होती; पण विनोदाचे टायमिंग मात्र माझ्यासारखेच होते,” असे अशोक सराफ यांनी नमूद केले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीविषयी बोलताना त्यांनी एक खंतही व्यक्त केली. लक्ष्मीकांत यांचे निधन तुलनेने लवकर झाले. ते आणखी काही वर्षे चित्रपटसृष्टीत असते, तर त्यांनी खूप मोठे यश मिळवले असते, असे अशोक सराफ म्हणाले. मात्र, त्यांच्या मते लक्ष्मीकांत यांच्या अभिनयप्रवासातील एक मर्यादा म्हणजे त्यांनी विनोदी भूमिकांवरच अधिक भर दिला. विनोदी अभिनयात त्यांची पकड जबरदस्त होती; परंतु अन्य प्रकारच्या भूमिका साकारण्याचे प्रयोग त्यांनी फारसे केले नाहीत, असे निरीक्षण अशोक सराफ यांनी मांडले.
या दोघांनी एकत्रितपणे तब्बल ५० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या सहकलाकाराबद्दल आठवणी सांगताना अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत यांच्यासोबतचे नातेही उलगडले. चित्रपटांमध्ये अशोक सराफ नायकाच्या भूमिकेत असायचे, तर लक्ष्मीकांत अनेकदा त्यांचे भाऊ, सहाय्यक किंवा प्रसंगी ड्रायव्हर अशा भूमिका साकारायचे. त्यामुळे पडद्यावर दोघांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाच्या बदलत्या प्रवाहावरही अशोक सराफ यांनी भाष्य केले. राजा परांजपे आणि मास्टर विनायक यांच्या काळात विनोदाची एक स्वतंत्र शैली होती. कालांतराने ती शैली कमी होत गेली. पिढ्या बदलत गेल्या तसतसा विनोदाचा बाज आणि सादरीकरणही बदलत गेले, असे त्यांनी सांगितले.
अशोक सराफ यांच्या या वक्तव्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयशैलीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सहजसुंदर विनोदाची आणि अशोक सराफ यांच्यासोबतच्या त्यांच्या गाजलेल्या जोडीची आठवण या निमित्ताने पुन्हा ताजी झाली आहे.