भारत-पाकिस्तान सामना २२ नोव्हेंबरला!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india-pakistan-match-on-november-22 पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत ‘अ’ आणि पाकिस्तान शाहीन यांच्यातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना २२ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानी संघाचे नेतृत्व अब्दुल समदकडे सोपवण्यात आले आहे.
 
india-pakistan-match-on-november-22
 
यंदाची आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा टी-२० ऐवजी ५० षटकांच्या एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. पाकिस्तानने जाहीर केलेल्या संघात हसन नवाज, हैदर अली, मुआज सदाकत, शमिल हुसेन आणि फरहान युसूफ यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. गोलंदाजीची धुरा मोहम्मद हसनैन, अहमद दानियाल, आकिफ जावेद आणि सुफियान मुकीम यांच्यावर असेल.
 
पाकिस्तान शाहीन संघाने यापूर्वी २०२३ मध्ये एकदिवसीय स्वरूपात झालेली ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यंदाही विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने पाकिस्तानी संघ मैदानात उतरेल. पाकिस्तानला भारत, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत एका गटात स्थान देण्यात आले आहे.
 
स्पर्धेची सुरुवात १९ नोव्हेंबरला होणार असली, तरी पाकिस्तानचा पहिला सामना २० नोव्हेंबर रोजी यूएईविरुद्ध होईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरला भारत ‘अ’ संघाशी सामना होणार असून, २५ नोव्हेंबरला पाकिस्तानचा संघ नेपाळशी भिडेल. दुसऱ्या गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि चीन या संघांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
 
पाकिस्तान शाहीन संघात अब्दुल समद (कर्णधार), अहमद दानियाल, आकिफ जावेद, दानिश अझीझ, फरहान युसूफ, हैदर अली, हसन नवाज, मुआज सदाकत, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इम्रान, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), साद मसूद, शाहजैब खान आणि शमिल हुसेन यांचा समावेश आहे.
 
भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व टिळक वर्माकडे असून रजत पाटीदार उपकर्णधार आहे. संघात अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, रिंकू सिंग, कुमार कुशाग्रा, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुग्गल, विप्रज निगम, तनेश कोटियन, राणा, राजकुमार यादव आणि अर्शद खान यांना स्थान देण्यात आले आहे.