नागपूर
Diwali दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या व निरुपयोगी वस्तूंचे योग्य संकलन, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाला सुरुवात झाली. महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ३) सिव्हिल लाईन्स येथील मनपा प्रशासकीय इमारतीत विशेष संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
दिवाळीच्या स्वच्छतेतून बाहेर पडणाऱ्या जुन्या, निरुपयोगी आणि वापरात नसलेल्या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये झोननिहाय आणि प्रभागनिहाय एकूण ४७ विशेष संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही केंद्रे ६ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.या केंद्रांवर नागरिकांना जुने कपडे, पुस्तके, खेळणी, घरगुती साहित्य आणि पुनर्वापरयोग्य वस्तू जमा करता येणार आहेत. संकलित वस्तूंचे वर्गीकरण करून पुनर्वापर व पुनर्चक्रण केले जाणार असून, उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, उपायुक्त राजेश भगत यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.नागरिकांनी घरातील निरुपयोगी वस्तू जवळच्या संकलन केंद्रावर जमा करून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नागपूर घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.