नागपूर
Nagpur Women Cricket Mayor Cup महिला क्रिकेट खेळाडूंच्या कौशल्याला, जिद्दीला आणि क्रीडासामर्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महिला क्रिकेट महापौर चषक २०२६’ या क्रिकेट स्पर्धेचे यशवंत स्टेडियम, धंतोली येथे दिमाखदार उद्घाटन झाले. १ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या स्पर्धेत महिला क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहरातील महिला क्रिकेटला नवी दिशा देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत वयाची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नसून सर्व महिला क्रिकेटपटूंसाठी स्पर्धा खुली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला जेतेपदाचा चषक आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला ५१ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या वैयक्तिक पुरस्कारांसाठी प्रत्येकी २१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.यशवंत स्टेडियम येथे स्पर्धेचे सामने दररोज सकाळी ८ वाजता आणि दुपारी १२ वाजता खेळविण्यात येणार आहेत. महिला क्रिकेटपटूंच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.महिला खेळाडूंच्या जिद्दीला आणि मेहनतीला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात महिला क्रिकेटला नवी ऊर्जा मिळणार आहे.