धनत्रयोदशीला ‘या’ वस्तूंची खरेदी ठरेल शुभ!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
dhanatrayodashi दिवाळीच्या सणाची चाहूल लागताच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असलेल्या धनत्रयोदशीला खरेदी करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यंदा ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, केवळ मौल्यवान धातूंचीच खरेदी करावी असे नाही, तर काही सामान्य वस्तूंचेही धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते.

dhanatrayodashi
धार्मिक श्रद्धेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू घरी आणल्याने सुख, समृद्धी आणि भरभराट येते. त्यामुळे अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खरेदी करतात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबतच पितळ, तांबे आणि स्टीलची भांडी खरेदी करण्याची परंपराही आहे. याशिवाय लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती, झाडू, धणे, गोमती चक्र, कवड्या, मीठ आणि दिव्यांची खरेदी करणेही शुभ मानले जाते. दिवाळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा समजला जातो.
धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तूंची विधीपूर्वक पूजा करण्याची परंपरा आहे. खरेदी केलेल्या वस्तू स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडले जाते. त्यानंतर त्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवल्या जातात. देवी लक्ष्मीची पूजा करून वस्तूंना कुंकवाचा टिळा लावला जातो आणि फुले अर्पण केली जातात. या वस्तू दिवाळीचा सण संपेपर्यंत पूजेच्या ठिकाणी ठेवण्याची धार्मिक पद्धत असल्याचे सांगितले जाते.
सध्या सोन्या-चांदीचे दर वाढल्यामुळे प्रत्येकालाच दागिने खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र, अशा वेळी चिंता करण्याची गरज नसल्याचे धार्मिक मान्यतांमध्ये सांगितले जाते. धनत्रयोदशीला धणे खरेदी करणेही शुभ मानले जाते. त्यामुळे मोठी खरेदी करणे शक्य नसले तरी आपल्या क्षमतेनुसार धणे किंवा इतर शुभ वस्तू घरी आणता येतात.
दरम्यान, धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करण्यामागेही धार्मिक परंपरा आहे. समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृताने भरलेला कलश घेऊन प्रकट झाल्याची मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याची प्रथा सुरू झाली, असे मानले जाते. पितळ आणि तांब्याच्या भांड्यांना विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय स्टील किंवा कांस्याची भांडी खरेदी करणेही शुभ मानले जाते.