मुंबई
Tusshar Kapoor बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देण्याचे आणि खंडणी मागण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असताना आता अभिनेता तुषार कपूर यालाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर याच्या नावाने तुषार कपूरला धमकीचा फोन करण्यात आला असून, त्याच्याकडे तब्बल पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, तुषार कपूर याने आपल्याला आलेल्या धमकीच्या फोनसंदर्भातील संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. अभिनेत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलिसांची पथके या प्रकरणातील प्रत्येक बाबीची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या फोनच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची तपासणी केली. त्यानंतर संबंधित आवाजाची तुलना हॅरी बॉक्सर याच्या अधिकृत ऑडिओ नमुन्याशी करण्यात आली. मात्र, दोन्ही आवाजांमध्ये साम्य नसल्याचे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुषार कपूरला आलेला फोन बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
लॉरेन्स गँगचे नाव वापरून एखाद्याला घाबरवण्याचा आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. धमकीचा ऑडिओ पाठवणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे. या प्रकरणामागील व्यक्तीचा हेतू काय होता, तसेच या धमकीचा लॉरेन्स गँगशी प्रत्यक्ष काही संबंध आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
तुषार कपूरच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, तो ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर आणि शोभा कपूर यांचा मुलगा आहे. त्याची बहीण एकता कपूर ही दूरचित्रवाणी आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. तुषारने २००१ मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने अभिनेत्री करीना कपूरसोबत काम केले होते. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता.
यानंतर त्याने ‘क्या दिल ने कहा’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’ आणि ‘ये दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. मात्र, ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘गोलमाल’ चित्रपटांच्या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल ३’ या चित्रपटांमधील त्याच्या विनोदी अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. याशिवाय ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही समीक्षकांकडून विशेष कौतुक झाले.
अभिनयासोबतच तुषार कपूर चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, जून २०१६ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून तो मुलगा लक्ष्यचा पिता झाला. एकीकडे तुषार कपूरच्या धमकीच्या फोनची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे या प्रकरणामागे नेमके कोण आहे, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.