भारत-न्यूझीलंड वनडे मोफत पाहा!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
watch-the-india-vs-new-zealand भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारी केली असून, भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे तर न्यूझीलंडची धुरा मिचेल सँटनरकडे असेल. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये असतानाच, सामना मोफत कुठे आणि कसा पाहता येईल, याची माहितीही समोर आली आहे.
 
watch-the-india-vs-new-zealand
 
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला होता. आता दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेचे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे टीव्हीवर सामना पाहण्यासाठी सोनी स्पोर्ट्सची वाहिनी उपलब्ध असेल, तर मोबाईलवर सोनी लिव्ह अॅपच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहता येईल. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेटवरही सोनी लिव्हद्वारे सामना पाहण्याची सुविधा आहे. मात्र, या सेवेसाठी आवश्यक सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.
 
ज्या क्रिकेट चाहत्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता टीव्हीवर सामना पाहायचा आहे, त्यांच्यासाठी डीडी स्पोर्ट्स हा पर्याय उपलब्ध आहे. डीडी फ्री डिश कनेक्शनच्या माध्यमातून भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण विनामूल्य पाहता येणार आहे. यासाठी डीडी फ्री डिशची सुविधा असणे आवश्यक आहे. या कनेक्शनच्या इन्स्टॉलेशनवेळी शुल्क आकारले जाते; मात्र त्यानंतर चॅनेल पाहण्यासाठी मासिक शुल्क द्यावे लागत नाही. दूरदर्शनने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. ही मोफत सुविधा टीव्हीपुरती मर्यादित असेल.
 
दरम्यान, भारतीय संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, नमन धीर, आकिब नबी, ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांचा समावेश आहे.
 
न्यूझीलंड संघात हेन्री निकोल्स, विल यंग, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टिकनर, टिम सेफर्ट आणि काइल जेमिसन या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.