water moving diva दिवाळी आणि रोषणाई यांचे नाते अतूट आहे. पूर्वी दिवाळीत घराघरांत मातीचे दिवे, तेल आणि वातीच्या साहाय्याने प्रकाश केला जायचा. मात्र, बदलत्या काळानुसार दिव्यांचे स्वरूपही आधुनिक झाले आहे. यंदा बाजारात मातीच्या पारंपरिक दिव्यांसारखे दिसणारे, मात्र त्यात चमचाभर पाणी टाकताच उजळणारे ‘वॉटर सेन्सर इलेक्ट्रिक दिवे’ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या दिव्यांसाठी तेल किंवा वात लागत नाही. तसेच ते सुरू किंवा बंद करण्यासाठी कोणत्याही बटणाचीही गरज नसते. त्यामुळे पारंपरिक रूप आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असलेले हे दिवे सध्या लोकप्रिय होत आहेत.

या दिव्यांमध्ये एलईडी लाईटसोबत धातूचे दोन छोटे इलेक्ट्रोड असतात. त्यांच्या तळाशी घड्याळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बटन सेल बॅटरी बसवलेल्या असतात. दिवा कोरडा असताना त्यातील विद्युत सर्किट पूर्ण होत नसल्याने एलईडी बंद राहते. मात्र, दोन्ही इलेक्ट्रोडवर पाणी पडताच त्यातील खनिजांमुळे विद्युत प्रवाहासाठी मार्ग तयार होतो आणि सर्किट पूर्ण होऊन दिवा प्रकाशमान होतो. घरगुती पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडिअमसारखी खनिजे विरघळलेली असतात. त्यामुळे अशा पाण्याच्या मदतीने दिवा सुरू होतो. अतिशय कमी खनिजे असलेल्या शुद्ध पाण्यात मात्र दिवा अपेक्षेप्रमाणे पेटेलच असे नाही.
या दिव्यांमध्ये एलईडी तंत्रज्ञान वापरले असल्याने विजेचा वापर होत नाही आणि बॅटरीची ऊर्जा कमी प्रमाणात खर्च होते. दिलेल्या माहितीनुसार, तीन लहान बटन सेलच्या साहाय्याने हे दिवे सलग ४० ते ५० तास प्रकाश देऊ शकतात. दिवा बंद करण्यासाठी त्यातील पाणी काढून तो सुती कपड्याने कोरडा करावा लागतो. सर्किट तुटल्यानंतर प्रकाश बंद होतो. बॅटरी संपल्यास दिव्याच्या खालचे झाकण उघडून नवीन सेल बसवता येतात. पारंपरिक दिव्यांचा लुक कायम ठेवत वापरण्यास सोपा पर्याय म्हणून या वॉटर सेन्सर दिव्यांना दिवाळीच्या खरेदीत पसंती मिळत आहे.