नागपूर,
diwali-faral-weight-gain-tipsदीपावलीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र फराळाची धामधूम पाहायला मिळत आहे. मात्र, काही कुटुंबांमध्ये ऑफिसच्या कामाच्या व्यस्ततेमुळे फराळ घरी बनवण्याऐवजी विकत घेण्यास पसंती दिली जाते. या फराळामध्ये सर्वाधिक क्रेझ असते ती चकली आणि बेसनाच्या लाडूची. त्यापाठोपाठ अनारसे, करंजी, शंकरपाळी, शेव आणि चिवडा यांचा क्रमांक लागतो.
दिवाळीपासून ते तुळशीविवाहापर्यंत हा फराळ सकाळच्या आणि संध्याकाळच्या नाश्त्याचा अविभाज्य भाग बनतो. मात्र, अनेकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे वजन वाढण्याची. त्यामुळे अनेकजण फराळ खाणे टाळतात. मात्र, न्यूट्रिशनिस्टच्या मते, केवळ फराळ खाल्ल्यानेच वजन वाढते असे नाही, तर चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यानेही वजन वाढू शकते.
वजन न वाढवता फराळ खाण्याच्या ट्रिक्स जाणून घ्या!
1. खाण्याची वेळ चुकवू नका – दुपारी 12 ते 4 ही वेळ निवडा
सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री 8 नंतर फराळ खाणे टाळा. दुपारी 12 ते 4 या वेळेत मर्यादित प्रमाणात फराळ खाण्याचा पर्याय निवडू शकता.
2. आधी प्रोटीन, मग फराळ
थेट लाडू किंवा चकली खाण्याऐवजी आधी मूठभर भाजलेले शेंगदाणे खा किंवा एक ग्लास ताक प्या. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होण्यास मदत होते आणि फराळाचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
3. एकाच वेळी अनेक पदार्थ खाणे टाळा
लाडू, चकली आणि करंजी असे सर्व पदार्थ एकाच वेळी खाणे टाळा. रोज थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचा फराळ खा. उदाहरणार्थ, आज एक लाडू, तर उद्या थोडी चकली असा पर्याय निवडा.
4. पाणी कधी प्यावे?
फराळ खाल्ल्यानंतर तहान लागल्यास पाणी पिणे टाळण्याची गरज नाही. दिवसभर पुरेसे पाणी प्या. कोमट पाणी पिणे हा देखील एक पर्याय आहे.
या पद्धतींचा अवलंब केल्यास दिवाळीचा आनंद घेत फराळाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या टिप्सचा वापर करून फराळाचा आस्वाद घ्या आणि वजन वाढण्याची चिंता न करता दिवाळीचा सण मनसोक्त साजरा करा.