अनिल कांबळे
नागपूर
justice- khobragade परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचा प्रेरणादायी प्रत्यय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांच्या जीवनप्रवासातून येतो. गावातील शालेय शिक्षणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास माळी, कार्यालयीन कारकून आणि वाहनचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार करत न्यायमूर्तीपदापर्यंत पोहोचला. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाने कनिष्ठ वकिलांना मेहनत, शिस्त आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले.
उच्च न्यायालय बार असोसिएशन, नागपूरच्या वतीने दिवंगत वरिष्ठ अधिवक्ता विनोद बोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘हायकोर्ट बार असोसिएशन स्टडी सर्कल’अंतर्गत ‘अ जर्नी बियॉन्ड सर्कमस्टन्सेस’ या विषयावर विशेष संवाद सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतार, संघर्ष आणि न्यायिक सेवेपर्यंतचा प्रवास उलगडला.
अधिवक्ता नहुष खुबालकर यांनी संवाद साधला, तर बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता अभय सांबरे यांनी सहसंवादकाची भूमिका बजावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासह न्यायमूर्ती धिगे, पानसरे, उर्मिला जोशी-फाळके, चांडवानी, रोहित जोशी, प्रवीण पाटील, निवेदिता मेहता, मेहरोज खान पठाण, नेर्लीकर, रजनीश व्यास आणि राज वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माळी म्हणून काम; शिक्षणाची जिद्द कायम
भंडारा जिल्ह्यातील रेंगेपारकोठा या गावात न्यायमूर्ती खोब्रागडे यांच्या शालेय जीवनाची सुरुवात झाली. व्यावसायिक जीवनाच्या प्रारंभी त्यांनी दिवंगत भाऊसाहेब बोबडे यांच्या बंगल्यावर रोजंदारीवर माळी म्हणून काम केले. त्यानंतर कार्यालयीन कारकून आणि वाहनचालक म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. कार्यालयीन काम करत असतानाच त्यांनी बी.कॉम. पदवी मिळवली आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
पुढे त्यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या कार्यालयात काम केले. शरद बोबडे न्यायाधीश झाल्यानंतर ते तत्कालीन अधिवक्ता अनिल किलोर यांच्या कार्यालयात रुजू झाले. याच काळात अधिवक्ता किलोर यांनी त्यांना जिल्हा न्यायाधीश पदाच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे न्यायिक सेवेच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञ आठवण न्यायमूर्ती खोब्रागडे यांनी व्यक्त केली.
कुटुंबीयांच्या योगदानाची कृतज्ञतेने आठवण
आपल्या यशामागे आई-वडील, दिवंगत भाऊसाहेब बोबडे, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अनिल किलोर आणि पत्नी जयश्री खोब्रागडे यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी जयश्री खोब्रागडे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही उपस्थित होते.
कनिष्ठ वकिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी कठोर परिश्रम, दृढनिश्चय, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा परिस्थिती नव्हे, तर ध्येयाप्रती असलेली बांधिलकी आणि प्रयत्नांची सातत्यपूर्ण तयारी यश निश्चित करतात, हा संदेश त्यांच्या अनुभवकथनातून मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अधिवक्ता तबिश मिर्झा यांनी केले. त्यांनीच आभार प्रदर्शनही केले.