व्हीबी- जी राम जी योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतीत कामांना चालना द्यावी : जिल्हाधिकारी

दुष्काळ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
वाशीम
district-collector-washim जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्हीबी- जी राम जी योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतीत कामांना चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील दुष्काळ देखरेख समितीची बैठक आज झाली, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
d collector
निवासी उपजिल्हाधिकारी श्याम घुगे, विविध यंत्रणांचे अधिकारी सभागृहात, तसेच, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी व्हीबी- जी रामजी योजनेतून जास्तीत जास्त कामे सुरू होणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्यावी. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने कार्यवाही करावी. कामे शेल्फवर नाहीत म्हणून चालना मिळाली नाही असे कुठेही घडता कामा नये. तसे घडल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांंनी संबंधित यंत्रणांना दिला. कृषी, वन विभाग, मृद व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा आदी विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
 
अवैध उपसा रोखण्यासाठी दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. ग्रामस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, आपदा मित्र, जलसुरक्षक आणि स्वयंसेवकांना जलस्रोतांवर नियमित देखरेख व गस्त घालण्यासाठी प्रोत्साहित करावे. पाणीबचतीविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. घरगुती पाणी बचतीबाबतही जागृती व्हावी. विशेषत: शिक्षण विभागाने शासकीय व खासगी शाळांच्या माध्यमातून जलदूत नेमावेत. विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरातील पाणी उपलब्धता, वापर असे वॉटर ऑडिट करण्याचे प्रोत्साहन द्यावे जेणेकडून पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहोचेल, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
 
चारा लागवडीच्या अनुषंगाने बियाणे वाटपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. जलसंधारणाची कामे व चारा लागवडीला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. जलाशयांतील पाणी उपलब्धता, वीजपुरवठा, सार्वजनिक वितरण प्रणाली आदी विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.