वाढते प्रदूषण हृदयासाठीही धोकादायक आणि...

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
rising-pollution-is-also-dangerous देशातील अनेक शहरांमध्ये वायुप्रदूषणाची समस्या गंभीर होत असून दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३५० च्या पुढे गेल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव आणि डोळ्यांची जळजळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीनंतर प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रदूषणाचा परिणाम केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित नसून हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
 
rising-pollution-is-also-dangerous
 
एजिलस डायग्नोस्टिक्सचे संचालक आणि एमडी पॅथॉलॉजी तज्ज्ञ डॉ. अजय फडके यांनी प्रदूषणामुळे हृदयावर होणाऱ्या परिणामांविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, हवेतील अतिसूक्ष्म प्रदूषक कण म्हणजेच PM2.5 फुफ्फुसांमध्ये पोहोचल्यानंतर रक्तप्रवाहातही प्रवेश करू शकतात. यामुळे शरीरात दाह निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. परिणामी, रक्तदाब वाढणे आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. या बदलांचा हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर काही दिवसांतच हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. त्यामुळे प्रदूषणाला केवळ श्वसनाशी संबंधित समस्या समजणे चुकीचे ठरू शकते. लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रदूषणाच्या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती तसेच दमा, सीओपीडी, हृदयविकार आणि मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी बाळगावी. हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर असली तरी संवेदनशील व्यक्तींना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषणाची कोणतीही पातळी पूर्णपणे सुरक्षित मानता येत नाही.
 
प्रदूषणाचा परिणाम शरीरावर झाल्यास सतत खोकला येणे, श्वास घेताना घरघर होणे, धाप लागणे आणि छातीत अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. खोकला दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ कायम राहिल्यास किंवा विश्रांतीच्या अवस्थेत ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स किंवा स्टिरॉइड्स घेणे टाळावे.
 
प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यास डॉक्टर लक्षणांनुसार सीबीसी, सीआरपी, इओसिनोफिल काउंट, आयजीई, स्पायरोमेट्री किंवा छातीचा एक्स-रे यांसारख्या तपासण्या सुचवू शकतात. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी ईसीजी, लिपिड प्रोफाइल, एचबीए१सी आणि एचएस-सीआरपी या चाचण्यांचीही आवश्यकता भासू शकते.
 
प्रदूषणाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक प्राथमिक तपासण्या करून घेणे आणि त्यानंतर आरोग्यातील बदलांनुसार पुन्हा तपासणी करणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. वेळीच निदान झाल्यास प्रदूषणामुळे फुफ्फुस आणि हृदयावर होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.