अनिल कांबळे
नागपूर
sexual-harassment महिलेचा वारंवार छळ करून लैंगिक संबंधांची मागणी करणे, बदनामीची धमकी देणे आणि तिच्यासह शेजारी महिलेचे छायाचित्र बदनामीकारक मजकुरासह झाडाखाली लावून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार हिंगणा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी प्रशांत सुरेश मनवर (३१, रा. प्रबुद्धनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असताना जानेवारी २०२५ मध्ये तक्रारदार महिलेची त्याच्याशी ओळख झाली. महिलेचा मुलगा रुग्णालयात दाखल असताना ही ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने तिच्याशी मैत्री वाढविली आणि आपण तिला पसंत करीत असल्याचे सांगितले.
मात्र, पुढे आरोपीने महिलेकडे वारंवार लैंगिक संबंधांची मागणी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. तो तिचा पाठलाग करून छळ करीत होता. तसेच, परिसरातील नागरिकांना महिलेला तेथे राहू देऊ नका, असे सांगून तिची बदनामी करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
छायाचित्रांद्वारे बदनामीचा प्रयत्न
आरोपीने महिला आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची छायाचित्रे बदनामीकारक मजकुरासह झाडाखाली लावली. दोघींची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हिंगणा पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.