तुळजापूर,
tuljapur-love-affair-murderमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूर नगरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अमीर पटेल या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असणारा अरबाज सय्यद हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तुळजापूर शहरात एकच तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमीर पटेल याचे तुळजापूर शहरातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. हे प्रकरण यापूर्वी मिटवण्यात आलं होतं, मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून मुलीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अमीरची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी कुटुंबातील सदस्यांना ओलीस ठेवून अमीर पटेलला जबरदस्तीने उचलून नेलं होतं. यानंतर निर्दयीपणे मारहाण करत त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे अमीर पटेल याचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार अरबाज सय्यद हा गंभीर जखमी झाला.
या संपूर्ण प्रकरणामागे प्रेम प्रकरणाचा वाद असून, या घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून एकूण १७ आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे. तसेच ही घटना 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणातून घडल्याची चर्चाही तुळजापुरात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. पोलीस या प्रकरणातील सर्व बाजू तपासून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
Quick Answers