मानोरा,
water-conservation दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय रोखणे आणि जलाशयातून होणारा अवैध पाणी उपसा थांबविण्याच्या दृष्टीने तालुयातील रुई (गोस्ता) ग्रामपंचायतीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार राजेंद्र पाटील आणि गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पाणी बचतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे महत्त्व अधिक वाढले असून, उपलब्ध पाणीसाठा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वापरणे आवश्यक आहे.

जलाशयातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासोबतच गावातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर जबाबदारीने करावा, असे आवाहन उपस्थित अधिकार्यांनी केले. बैठकीला नायब तहसीलदार अष्टुरे, उपविभागीय अधिकारी ढोके, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता खंडारे, तलाठी लबडे, ग्रामपंचायत विकास अधिकारी विजया खाडे, उपसरपंच धनश्री गावंडे, ग्रामपंचायत सदस्य शरद धोंगडे, प्रकाश ठोंबरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अधिकार्यांनी जलाशयातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गावातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता समिती कार्यान्वित करून तिच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. पाण्याची उपलब्धता, त्याचा योग्य वापर आणि भविष्यात उदभवू शकणारी टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने दक्ष राहण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्यापूर्वीच प्रत्येकाने पाणी बचतीची सवय अंगीकारणे गरजेचे आहे. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये पाणी बचत, जलसंधारण आणि जलसाठ्याच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.