अबू सालेम भेटप्रकरणी प्यारे खान यांना पदावरून हटवा

विश्व हिंदू परिषदेची मागणी

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
एनआयए आणि सीबीआयमार्फत चौकशीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
गोंदिया,
demand-by-the-vishva-hindu-parishad महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शासकीय नाशिक दौर्‍यादरम्यान १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम याची नाशिक कारागृहात भेट घेतल्याच्या वृत्तामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विश्व हिंदू परिषद, गोंदिया जिल्ह्याच्या वतीने प्यारे खान यांना अध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.
 
 
demand-by-the-vishva-hindu-parishad
 
सादर निवेदनानुसार, संवैधानिक जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम याची कारागृहात भेट घेणे आणि त्याला मदतीचे आश्वासन दिल्याचे वृत्त अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारामुळे शासनाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, संबंधित पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोपही विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या भेटीमागील नेमकी कारणे, राष्ट्रहिताशी संबंधित बाबी आणि संभाव्य संलग्नतेच्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
 
त्यामुळे प्यारे खान यांना पदावरून तातडीने हटवून त्यांच्या जागी अल्पसंख्याक समाजातील अन्य योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची एनआयए आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदनाच्या पती देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिकमजी शर्मा, प्रांत सहमंत्री देवेश मिश्रा, जिल्हामंत्री मुकेश उपराडे, सहमंत्री सुनील कोहळे व हरीश अग्रवाल, मठ-मंदिर प्रमुख विठ्ठल कोठेवार, जिल्हा प्रचार-प्रसार प्रमुख प्रदीप बिसेन, जिल्हा संयोजक हार्दिक जीवानी, जिल्हा सहसंयोजक रुपेश मेश्राम, नगर संयोजक प्रमोद शहारे, कोमल रहांगडाले, जिल्हा धर्मयात्रा प्रमुख राजकुमार टेंभरे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.