ज्ञानेश कुमारांवर दोन कोटींच्या लाचेचा आरोप!

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
तिरुवनंतपुरम,
dnyanesh-kumar भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित २००६ मधील जुन्या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. केरळमधील रस्ते विकास प्रकल्पात कथित लाचखोरी आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा करण्यात आला असून, त्याच्याशी संबंधित मलेशियन अभियंत्याच्या आत्महत्येचाही मुद्दा उपस्थित झाला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत केरळ सरकारने प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
dnyanesh-kumar
 
या प्रकरणाचा संबंध २००५-०६ या काळातील केरळमधील रस्ते विकास प्रकल्पाशी आहे. त्यावेळी ज्ञानेश कुमार हे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. या प्रकल्पाचे काम भारत आणि मलेशियाच्या संयुक्त कंपनीकडे होते. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आणि मलेशियन व्यावसायिक ली सी बीन यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये मलेशियात आत्महत्या केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी थकित बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आणि जाणूनबुजून देयके रोखून धरल्याचा आरोप समोर आला होता. ली यांच्या कथित सुसाईड नोटमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावाही आता पुन्हा करण्यात आला आहे.
 
या प्रकरणाला आता नव्याने तोंड फुटण्यामागे साजन नावाच्या कंत्राटदाराने केरळ सरकारच्या गृह विभागाकडे दाखल केलेली तक्रार महत्त्वाची ठरली आहे. साजन हे पीएटीआय-बीईएल (PATI-BEL) कंपनीसाठी साहित्य पुरवठादार म्हणून काम करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाची थकबाकी मंजूर करून घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचे ली सी बीन यांनी स्वतः त्यांना सांगितले होते. मात्र, कंपनीने लाच देण्यास नकार दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
थकित बिले वेळेवर मंजूर न झाल्यामुळे स्थानिक कंत्राटदार आणि पुरवठादारांना त्यांची देणी चुकती करता आली नाहीत. त्यामुळे ली सी बीन यांच्यावर मोठा आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला होता आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप साजन यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी सुरू झाल्यास आवश्यक पुरावे सादर करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.