मानोरा
godan gopujan बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे वसू बारस निमीत्त भव्य व ऐतिहासिक गोदान आणि गोपूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आद्य गोरक्षक संत सेवालाल महाराज गोदान महासोहळा यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठा ५ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता शेकडो संत महतांच्या उपस्थीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या महासोहळ्याच्या सुरवातीला धर्मगुरु आमदार बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते वसू बारसच्या मुहूर्तावर गोमाता पूजन, संत रामराव मदीरात महाआरती व अरदास म्हणण्यात आली. यावेळी महंत शेखर महाराज यांनी भोग लावला. यावेळी गोदान संवाद विचारपीठावर भागवत महर्षी संत मनीष भाई, आचार्य विष्णु महाराज मध्य प्रदेश, विष्णु गीरी महाराज महामंडलेश्वर, रामदास महाराज गराशागड, अंकुशानंद महाराज बासर, प्रेमचंद महाराज वृदांवन घाम, बंडु महाराज दापेकर, जगदीश भारती, कैलास महाराज, शेखर महाराज पिंपळगाव, गोर्वधन राठोड आर्णी, पंकज महराज,देवीदास राठोड, मंगल नायक उत्तर प्रदेश, रतन नायक तेलगंना, महंत सुनील महाराज, शेखर महाराज, संजय महाराज, भक्तराज महाराज उपस्थित होते. यावेळी गोमाताचा व भारत मातेचा जयघोष आसमंतात दुमदूमत होता. या कार्यक्रमाला सनातन हिंदू समाज बांधवांची, महिलाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी कोळी, साई (ईजारा ), तुळशीनगर येथील गोपालकांनी संगीताच्या तालावर गाईंना घोंगडी वर बसवुन अद्भूत दृश्य दाखवून उपस्थित गोप्रेमीची मने जिंकली. बंजारा संस्कृती आणि गोवंशाचे नाते अनादी काळापासून अविभाज्य राहिले आहे. वसुबारस व भाऊबीजेच्या पावन पर्वावर गोदानाचा ऐतिहासिक संकल्प पूर्ण केला जातो. गोसेवा, गोसंवर्धन आणि गोरक्षणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे हा महासोहळ्याचा मुख्य उद्देश होता. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.