भीषण अपघात दोन जवानांचा मृत्यू

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
लडाख
ladakh army truck accident
लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर नामिका ला खिंडीजवळ भारतीय लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला. लष्कराचा अवजड ट्रक रस्त्यावरून घसरून सुमारे ६०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत वाहनातील चालक आणि सहचालक अशा दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. अद्याप मृत जवानांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतरच नावे प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी वाहनांचा ताफा एका अरुंद रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी आवश्यक साहित्य घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रकचा एका वळणावरून ताबा सुटला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. या वळणावर वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. वाखा येथे तैनात असलेले स्थानिक पोलीस आणि कारगिलमधील जिल्हा कमांड यांनी लष्करी पथके, इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.अपघातस्थळी पोहोचणे हे बचाव पथकांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. परिसरात मोठे खडक, सैल दगड आणि हिमस्खलनाचा धोका असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण बनले होते. प्रतिकूल परिस्थितीत राबवलेल्या मोहिमेनंतर वाहनाच्या अवशेषांमधून दोन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह चिकटन येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण आणि अपघाताची परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी नियमानुसार शवविच्छेदनासह आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

दरम्यान, अपघाताची चौकशी तातडीने सुरू करण्यात आली आहे. वाखा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौकशीत तांत्रिक बिघाड, मानवी चूक आणि पर्यावरणीय परिस्थिती अशा सर्व संभाव्य कारणांचा तपास केला जाणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. चौकशी निष्पक्षपणे केली जाईल, असेही लष्कराकडून सांगण्यात आले.

यापूर्वी पुंछमध्ये दरीत वाहन कोसळून सहा जणांचा मृत्यू

दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातही भीषण अपघात झाला होता. सुरनकोटमधील शेलधर परिसरात एक वाहन खोल दरीत कोसळले होते. या दुर्घटनेत दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले होते. या अपघाताबद्दल जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त केले होते. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.