बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय बालकाचा मृत्यू

दोनाड गावातील शेतशिवारातील घटना

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
लाखांदूर :
leopard-attack मालकीच्या शेतात कापणी केलेले धान पीक गोळा करण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांसोबत शेतात उपस्थित असलेल्या एका ५ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील दोनड गावाच्या शेतशिवारात घडली. या घटनेत स्थानिक दोनाड येथील निवासी मोक्ष सचिन बुरडे (०५) असे मृत बालकाचे नाव आहे.
 

attack
पोलिस सूत्रानुसार, घटनेतील पीडित बालकाच्या कुटुंबीयांची स्थानिक दोनड येथील वैनगंगा नदी घाट परिसरात काही एकर शेती आहे. या शेतीत कुटुंबीयांनी यावर्षी खरीप हंगामात धान पिकाची पेरणी केली होती. तर काही दिवसांपूर्वी पीडित बालकाच्या कुटुंबीयांनी धान पिकाची कापणी केली होती.
 
घटनेच्या दिवशी पीडित बालकाचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय मालकीच्या शेतात कापणी केलेले धान पीक गोळा करण्यासाठी शेतात गेले होते. यादरम्यान पीडित बालकही स्वतःच्या आई-वडिलांसोबत मालकीच्या शेतात गेला होता. कापणी केलेले धान पीक गोळा करण्यात व्यस्त असलेल्या आई-वडिलांसोबत पीडित बालक शेतातच उभा होता.
 
यादरम्यान अचानक जंगलातून भटकून शेतशिवारात घुसलेल्या बिबट्याने बालकावर हल्ला केला. बिबट्याने बालकाला तोंडात पकडून शेतशिवारात सुमारे ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ही घटना शेतात उपस्थित असलेल्या आई-वडील आणि कुटुंबीयांच्या लक्षात येताच उपस्थितांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून बिबट्याने बालकाला शेतशिवारातच सोडले आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, बिबट्याने पीडित बालकाला ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्यामुळे बालकाचा मृत्यू झाला.
 
या घटनेची माहिती लाखांदूरच्या वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने व ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली वनरक्षक तुकाराम डावकोरे, चंदन जारवाल, शीघ्र बचाव पथकाचे सदस्य तसेच सहायक ठाणेदार आशीष गंद्रे, पोलीस हवालदार राजेंद्र कुरुडकर, जयेश जवांजारकर, संतोष चव्हाण, पोलीस शिपाई ओंकार सपाटे, लंकेश राउत व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून दिला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.