चारित्र्याच्या संशयाने मोडला अमेरिकेतील संसार; तान्ह्या बाळासाठी आईचा तीन वर्षे संघर्ष!

गर्भवती असताना घराबाहेर काढले, आश्रयगृहात बाळाला जन्म; नागपुरात घटस्फोटाने छळाच्या चक्रातून सुटका

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
marriage-in-america-falls सातासमुद्रापार सुखी संसाराची स्वप्ने घेऊन गेलेली एक उच्चशिक्षित तरुणी चारित्र्यावरील संशयाच्या वादळात सापडली. गर्भात बाळ असताना पतीनेच घराबाहेर काढले. अनोळखी देशात ना हक्काचे घर, ना जवळची माणसे आणि ना आर्थिक आधार! अशा परिस्थितीत तिने आश्रयगृहाचा आधार घेतला, तिथे बाळाला जन्म दिला आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संघर्ष सुरू केला. पतीविरुद्ध न्यायालयीन लढा देण्याचे धाडसही दाखवले. मात्र, आर्थिक आणि मानसिक संघर्षाने खचलेल्या या महिलेने अखेर भारतात परतण्याचा निर्णय घेतला. नागपुरातही पतीने संसार पुन्हा थाटण्यास नकार दिल्यानंतर तिने घटस्फोटासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. अखेर तीन वर्षांच्या संघर्षानंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आणि तिची छळाच्या चक्रातून सुटका झाली.
 
nagpur
 
नागपुरातील जरीपटका परिसरातील अजय आणि संजना (नावे बदललेली) दोघेही उच्चशिक्षित. अजय सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर संजना आर्किटेक्ट. नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत स्थायिक झालेल्या अजयने २०२० मध्ये संजनासोबत विवाह केला. काही काळ माहेरी राहिल्यानंतर संजनाही अमेरिकेत पतीकडे गेली. दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. परदेशातील नव्या आयुष्याला आकार मिळत असतानाच संजना गर्भवती असल्याची आनंदवार्ता आली. मात्र, या आनंदाला लवकरच संशयाचे ग्रहण लागले.
बहिणीच्या संशयातून संसारात वादळ?
अजय आपल्या आई-वडिलांसह नागपुरात राहणाऱ्या बहिणीलाही आर्थिक मदत करीत होता. बहिण मुलासह माहेरी राहत होती. संजना गर्भवती झाल्यानंतर अजयचे आर्थिक सहकार्य कमी होईल, अशी भीती बहिणीला वाटू लागल्याचा आरोप आहे. त्यातून तिने आई-वडिलांच्या मदतीने संजनाच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. संजनाचे नागपुरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे अजयच्या मनात पत्नीविषयी संशय निर्माण झाला आणि दोघांच्या नात्यात दुरावा वाढत गेला. संजनाच्या म्हणण्यानुसार, पतीकडून मारहाण आणि छळ सुरू झाला. गर्भवती असतानाच तिला घराबाहेर काढण्यात आले. ज्या काळात पतीच्या आधाराची आणि कुटुंबाच्या मायेची सर्वाधिक गरज होती, त्याच काळात तिला परक्या देशात एकाकी आयुष्याचा सामना करावा लागला.
प्रसूतीनंतर सातव्या दिवशीच कामाची वेळ
निराधार झालेल्या संजनाने अमेरिकेतील महिला आश्रयगृहाचा आधार घेतला. तिथेच तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या जन्मानंतरही तिच्या संघर्षाला विराम मिळाला नाही. आश्रयगृहाच्या नियमानुसार प्रसूतीनंतर सातव्या दिवसापासून तिला भांडी घासणे, कपडे धुणे आणि स्वच्छतागृहाची साफसफाई यांसारखी कामे करावी लागत होती, अशी माहिती आहे. एका बाजूला स्वतःची शारीरिक स्थिती, दुसरीकडे तान्ह्या बाळाची जबाबदारी आणि त्यात भविष्याची चिंता! अशा परिस्थितीतही संजनाने हार मानली नाही. बाळाच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या हक्कांसाठी तिने काम करण्यास सुरुवात केली. तान्ह्या बाळाला आश्रयगृहात ठेवून ती कामावर जाऊ लागली. परिस्थितीने तिला परावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला; मात्र, तिने स्वाभिमानाने उभे राहण्याचा मार्ग निवडला.
परदेशात न्यायासाठी लढली; अखेर मायदेशी परतली
पतीकडून झालेल्या कथित छळाविरोधात संजनाने अमेरिकेतील न्यायालयात दाद मागितली. मात्र, आर्थिक अडचणी आणि तान्ह्या बाळाची जबाबदारी यामुळे तिचा संघर्ष अधिक कठीण होत गेला. अखेर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. बाळाला मायदेशी आणण्यासाठीही तिला विविध कायदेशीर अटींचा सामना करावा लागला. नागपुरात परतल्यानंतरही तिने संसार वाचवण्याची आशा सोडली नाही. पतीसोबत पुन्हा संसार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारित्र्यावरील संशय कायम असल्याने पतीने एकत्र राहण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. संसार टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मार्ग निघत नसल्याने अखेर संजनाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
महिला वकिलाची साथ; तीन वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम
या कठीण काळात ॲड. मीरा क्षीरसागर यांनी संजनाला कायदेशीर मदतीचा हात दिला. तिची परिस्थिती समजून घेत समुपदेशन केले आणि न्यायालयीन लढ्यात सहकार्य केले. पतीने न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य केले नसल्याचे सांगण्यात आले. अखेर संजनाची परिस्थिती आणि तिचा संघर्ष लक्षात घेऊन न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. तीन वर्षांच्या संघर्षानंतर संजनाला वैवाहिक नात्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. हा केवळ घटस्फोटाचा निकाल नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःचे अस्तित्व, स्वाभिमान आणि बाळाचे भविष्य जपण्यासाठी लढणाऱ्या एका महिलेच्या जिद्दीची कहाणी आहे. परदेशातील एकाकीपणा, आर्थिक विवंचना आणि नात्यांतील संशय यांचा सामना करत तिने अखेर स्वतःसाठी नवा मार्ग निवडला.