अनिल कांबळे
नागपूर,
bhandewadi dumping yard भांडेवाडी येथील महापालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा प्रक्रिया करणाऱ्या ट्रोमेल मशीनमध्ये अडकून २८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अपघाताची माहिती देऊनही महापालिका आणि वाठोडा पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, अशी माहिती आहे. सलमान अय्युब खान (२८, रा. अंतुजीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
महापालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सलमान आणि अक्षय विळकर हे दोघे ट्रोमेल मशीनची सफाई करीत होते. यावेळी अचानक सलमानचा पाय मशीनमध्ये अडकला. मशीनच्या विळख्यात सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. सोबत काम करणाऱ्या अक्षयने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. या दुर्घटनेत सलमानचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांच्या विलंबामुळे संताप?
अपघातानंतर महापालिका प्रशासन, संबंधित खासगी कंपनी आणि वाठोडा पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. मात्र, सकाळची वेळ असल्याने जबाबदार अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला. काही अधिकारी बराच विलंब झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी राजेश दुपारे आणि वाठोडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याचा आरोप आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न!
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी पोलिस ठाणे गाठले. आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कामगाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची चौकशी, मशीनच्या सफाईदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या का आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी काय, असे प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.