देवरी,
pickup-truck-transporting-illegal-teak-wood-falls उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणारे पिकअप वाहन वनविभागाच्या कर्मचार्यांनी पकडले. या कारवाईत वाहनासह सुमारे १ लाख ६ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर देवरी वन विभागाचे वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना एमएच ३६ एए ४३९७ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वनकर्मचार्यांनी सापळा रचून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. वनकर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे वाहन ताब्यात घेण्यात यश आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सागवान जातीचे एकूण ६ नग लाकूड आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या लाकडाचे एकूण घनफळ २.०८४ घनमीटर असून त्याची अंदाजित किंमत १ लाख ६ हजार ८०९ रुपये आहे. दरम्यान, वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून वनविभागामार्फत त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी वाहन व लाकूड जप्त करून भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा क्र. ०१/२०२६/९८५४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनविभागामार्फत सुरू आहे.
वनविभागाची संयुक्त कारवाई
ही कारवाई उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग व सहाय्यक वनसंरक्षक एस. एम. डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. धोटे-मिश्रा, क्षेत्र सहाय्यक जी. आय. लांजेवार तसेच वनरक्षक एस. यु. चव्हाण, जे. एस. केंद्रे, एस. टी. ब्रह्मणावत, ए. जी. कानगुले, व्ही. एस. मेथलवाड, डी. बी. केंद्रे आणि वनपरिक्षेत्र लाखनी येथील वनपाल मेश्राम, वनरक्षक बाळासाहेब निश्चीत व इतर वनकर्मचार्यांनी पार पाडली.