PNB मध्ये १०.२४ कोटींचा घोटाळा उघड

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
pnb bank fraud
बँकांमधील आर्थिक गैरव्यवहारांच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) एका शाखेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ग्रेटर नोएडातील बँकेच्या शाखेत ग्राहकांच्या खात्यांमधून त्यांच्या परवानगीशिवाय तब्बल १०.२४ कोटी रुपये काढण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिली आहे. या प्रकरणी सीबीआयने बँकेतील महिला कर्मचाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


गेल्या काही वर्षांत बँका आणि पतसंस्थांमधील आर्थिक अफरातफरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यातून पैसे काढणे, नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप करणे आणि इतर मार्गांनी आर्थिक गैरव्यवहार करणे, अशा प्रकारांची प्रकरणे उघड झाली आहेत. काही बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँकेनेही कठोर कारवाई केली आहे. आता पंजाब नॅशनल बँकेतील या कथित घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा बँकांमधील ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपांशी नावाची महिला कर्मचारी ग्रेटर नोएडातील सेक्टर-१ येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ऑफिस असिस्टंट म्हणून कार्यरत होती. या प्रकरणात आशुतोष पाठक या अन्य आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या दोघांनी काही अज्ञात आरोपींच्या मदतीने ग्राहकांच्या खात्यांमधून त्यांच्या परवानगीशिवाय पैसे काढल्याचा आरोप आहे. या माध्यमातून सुमारे १०.२४ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. एका महिलेने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू करून दोन्ही आरोपींना अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून हा गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि ग्राहकांच्या खात्यांमधून पैसे काढण्याची पद्धत नेमकी काय होती, याचा तपास आता सीबीआयकडून केला जात आहे.