पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
पाकिस्तान
pok unrest
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. रावळकोट परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून नागरिकांच्या घरांवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. रावळकोटमधील उमर फारुख चौक परिसरात गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईविरोधात नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत.




स्थानिक नागरिकांनी पाकिस्तानी सैन्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानी लष्कर जाणीवपूर्वक नागरिकांना लक्ष्य करत असून घरांवर हल्ले केले जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निःशस्त्र नागरिकांवरही गोळीबार होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही दृश्यांमध्ये घरांना आग लागल्याचे आणि घटनास्थळी पडलेले धातूचे तुकडे दाखवण्यात येत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्याने आमच्या मृत्यूचे वॉरंटच काढले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत.

मुनीर यांच्या नेतृत्वाखालील सैन्याविरोधात संताप

सोशल मीडियावर समोर आलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये सातत्याने गोळीबाराचे आवाज ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी रावळकोटमध्ये नागरिक आणि मुलांनाही लक्ष्य केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र, या कारवाईला घाबरून माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील सैन्याचा सामना करण्यास आपण तयार असल्याचेही काही नागरिकांनी म्हटले आहे.

मोबाईल सेवा आणि इंटरनेट बंद; स्वायत्ततेची मागणी

रिपोर्टनुसार, रावळकोटमध्ये सरकारी मोबाईल सेवा आणि इंटरनेट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या मागण्या केवळ वीज आणि पीठपुरवठ्यापुरत्या मर्यादित नाहीत. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच प्रशासनात अधिक स्वायत्तता मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, जून २०२६ मध्ये निदर्शने सुरू झाल्यापासून पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये १५३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. रावळकोटमधील ताज्या हिंसाचारामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे.