मुंबई
jailer 2 दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चित्रपटगृहांमध्ये दमदार कमाई करणारा त्यांचा ‘जेलर २’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा अॅक्शन ड्रामा १२ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियन या लोकप्रिय भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाने जगभरात ८०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाच भाषांमध्ये पाहता येणार चित्रपट
प्राइम व्हिडिओने ५ नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ‘जेलर २’च्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली. ‘टायगर मुथुवेल पांडियन परतला आहे. रीलोडेड!’ अशा आशयाची पोस्ट प्लॅटफॉर्मने शेअर केली. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध भाषांमधील प्रेक्षकांना रजनीकांत यांचा अॅक्शन अवतार पुन्हा अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे ‘जेलर’चा पहिला भागही प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मुथुवेल पांडियनच्या कथेचे दोन्ही भाग पाहण्याची संधी मिळणार आहे.
कुटुंबाच्या रक्षणासाठी मुथुवेल पांडियन पुन्हा मैदानात
‘जेलर २’ची कथा पहिल्या भागातील घटनांपुढे सरकते. निवृत्त झालेल्या जेलर मुथुवेल पांडियनला पुन्हा एकदा आपल्या जुन्या जगात परतावे लागते. यावेळी एक शक्तिशाली गुन्हेगारी टोळी त्याच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठी धोका निर्माण करते. त्यामुळे कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मुथुवेल पांडियन गुन्हेगारांशी दोन हात करतो. जुन्या शत्रूंचे पुनरागमन आणि नव्या युतींच्या पार्श्वभूमीवर तो परिस्थितीचा सामना कसा करतो, याभोवती चित्रपटाची कथा फिरते. अॅक्शनसोबतच भावनिक प्रसंगांनाही चित्रपटात महत्त्व देण्यात आले आहे.
मोहनलाल, हृतिक रोशन आणि विजय सेतुपती यांचे विशेष कॅमिओ
‘जेलर २’ची स्टारकास्टही लक्षवेधी आहे. रजनीकांत यांच्यासोबत मोहनलाल, हृतिक रोशन आणि विजय सेतुपती विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय एस. जे. सूर्या, शिवराजकुमार, सूरज वेंजारामूडू, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, रम्या कृष्णन, नमो नारायण आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन यांनी निर्मिती केली आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
दिग्दर्शक नेल्सन यांनी व्यक्त केला आनंद
ओटीटी प्रदर्शनाबाबत बोलताना दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी पहिल्या ‘जेलर’ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची आठवण करून दिली. मुथुवेल पांडियन या व्यक्तिरेखेला मिळालेल्या प्रेमामुळे हा प्रवास खास ठरल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेलर २’च्या माध्यमातून प्रेक्षकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा आणि कथा, अॅक्शन, भव्यता तसेच भावनिक पैलू नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. रजनीकांत यांची प्रतिष्ठित भूमिकेतील पुनरागमन आणि दमदार कलाकारांची साथ यामुळे चित्रपट विशेष ठरल्याचेही ते म्हणाले. अनिरुद्ध यांच्या संगीताने चित्रपटाला वेगळी ऊर्जा दिल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स ऑफिसवर ८२० कोटींचा टप्पा पार
ओटीटी प्रदर्शनाची घोषणा झाली असली तरी चित्रपटगृहांमध्ये ‘जेलर २’ची घोडदौड सुरूच आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या २२व्या दिवसापर्यंत चित्रपटाने भारतात ५४५.३० कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली होती. तर नेट कलेक्शन ४६६.२२ कोटी रुपये नोंदवण्यात आले. जगभरातील कमाईचा आकडा ८२० कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचेही सांगण्यात आले आहे. यासह सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट म्हणून त्याने विक्रम केल्याचा दावा आहे. आता बॉक्स ऑफिसवरील यशानंतर ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.