ramayana movie दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. भव्य दृश्ये, विशाल सेट आणि दमदार अॅक्शन यांमुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटात भावनिक प्रसंगांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. रावणाच्या दहा तोंडांतून व्यक्त होणारे त्याचे अहंकार आणि मनातील विचार, जटायूचे बलिदान, राम-परशुराम यांची भेट तसेच वनवासासाठी अयोध्येतून निघताना झालेली भावनिक निरोपाची वेळ असे अनेक प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. चित्रपटातील असेच सात खास प्रसंग जाणून घेऊया.

१. रावणाच्या दहा तोंडांतून उमटणारे वेगवेगळे विचार
चित्रपटातील रावणाच्या दहा तोंडांचा प्रसंग विशेष लक्षवेधी ठरतो. या दृश्यात रावण मध्यभागी बसलेला असतो आणि त्याची दहा तोंडे एकामागून एक वेगवेगळ्या रूपांत समोर येतात. प्रत्येक तोंडाचा आवाज आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. एक तोंड त्याला एका प्रकारचा सल्ला देते, तर दुसरे त्याला वेगळ्याच दिशेने प्रवृत्त करते. या संवादांतून रावणाच्या मनातील विचारांचा संघर्ष आणि त्याचा अहंकार अधोरेखित होतो. रावणाची दहा तोंडे केवळ त्याच्या शक्तीचे प्रतीक न राहता त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूही उलगडतात.
२. जटायूचे बलिदान आणि रामांकडून अंतिम संस्कार
रावणाशी लढताना गंभीर जखमी झालेला जटायू जंगलात कोसळतो. काही वेळाने राम त्याच्याजवळ पोहोचतात. जटायू त्यांना सीतेच्या अपहरणाची संपूर्ण घटना सांगतो आणि त्यानंतर अखेरचा श्वास घेतो. या प्रसंगानंतर चित्रपटातील भावनिक क्षण अधिक गहिरा होतो. अनेक पक्षी चितेसाठी लाकडे घेऊन येतात आणि राम स्वतः जटायूला पित्यासमान मानून त्याचे अंत्यसंस्कार करतात. रामांनी दिलेला हा निरोप त्याग, निष्ठा आणि रक्ताच्या नात्यापलीकडील प्रेमाचे दर्शन घडवतो.
३. सीतेच्या रक्षणासाठी जटायूचा रावणाशी संघर्ष
सीतेचे अपहरण करून रावण पुष्पक विमानातून जात असताना जटायू त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी तो अखेरच्या श्वासापर्यंत लढतो. एका दृश्यात जटायू पुष्पक विमानावर जाऊन बसतो आणि सीतेकडे आपला पंजा पुढे करतो. जणू काही तो त्यांना रावणाच्या तावडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, जटायूचा प्रयत्न यशस्वी होण्याआधीच रावण त्याच्यावर हल्ला करतो. सीतेच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जटायूचे धैर्य या प्रसंगातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.
४. राम-परशुराम आमनेसामने; वादळात झाली विष्णू अवताराची ओळख
सीतेशी विवाह झाल्यानंतर रामाची वरात अयोध्येकडे परतत असते. त्याचवेळी जोरदार वादळाच्या पार्श्वभूमीवर परशुराम यांची एंट्री होते. त्यानंतर राम आणि परशुराम यांच्यात संवाद सुरू होतो. या प्रसंगात परशुराम रामांच्या दिशेने भाला फेकतात; मात्र राम तो सहज पकडतात. रामांचे हे सामर्थ्य पाहून परशुराम यांना त्यांची खरी ओळख पटते. समोर उभे असलेले राम हे साधे मनुष्य नसून स्वतः भगवान विष्णूंचे अवतार असल्याची जाणीव त्यांना होते. संघर्ष, संवाद आणि ओळखीचा हा क्षण चित्रपटातील महत्त्वाचा प्रसंग ठरतो.
५. खर-दूषणाच्या सैन्याचा रामांकडून एका बाणात पराभव
शूर्पणखेचे नाक कापल्यानंतर खर आणि दूषण विशाल राक्षस सैन्यासह रामांवर हल्ला करण्यासाठी येतात. युद्ध सुरू असताना राम, सीता आणि लक्ष्मण एका अशा ठिकाणी पोहोचतात, जिथे डोंगर संपतो आणि पुढे खोल दरी आहे. राम सीता आणि लक्ष्मण यांना सुरक्षित ठिकाणी थांबवतात आणि स्वतः काही पावले मागे जातात. त्यानंतर मंत्रोच्चार करत धनुष्यातून एक बाण सोडतात. या बाणासोबत उठलेल्या प्रचंड वादळात राक्षस सैन्याचा नाश होतो. या प्रसंगातून रामांचे पराक्रमासोबतच आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्याचा निर्धारही दिसून येतो.
६. वनवासासाठी रामांची अयोध्येतून विदाई; दशरथांना अश्रू अनावर
वनवासाला जाण्यापूर्वी राम कैकेयी यांच्याकडून एक वचन घेतात. अयोध्येत परतल्यानंतर पहिला घास त्यांच्या हातूनच खाण्याची इच्छा ते व्यक्त करतात. त्यानंतर राम अयोध्येतून निघत असताना नागरिक त्यांना थांबवण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतात. त्यावेळी सीता पुढे येऊन लोकांना समजावतात. रामांसोबत पत्नीधर्म निभावण्यासाठी आपण वनवासाला जात असल्याचे, तर लक्ष्मण बंधुधर्मामुळे सोबत येत असल्याचे त्या सांगतात. नागरिकांनी अयोध्येत थांबून तिची जबाबदारी सांभाळावी, असे आवाहनही त्या करतात. हळूहळू लोक बाजूला होतात आणि रामांचा रथ पुढे निघतो. मात्र, मुलाला जाताना पाहून राजा दशरथ भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि बेशुद्ध होऊन पडतात. हा प्रसंग पिता-पुत्राच्या नात्यातील वेदना अधोरेखित करतो.
७. दशरथांची अखेरची हाक आणि रामांचे अचानक मागे वळून पाहणे
दशरथांच्या मृत्यूचा प्रसंगही अत्यंत भावनिक आहे. रामांना वनवासाला जावे लागल्याच्या दुःखाने दशरथ व्याकूळ झालेले असतात. आपल्या पापांची शिक्षा मुलाला भोगावी लागत असल्याची खंत त्यांच्या मनात असते. वनात राम कसे असतील, याची चिंता त्यांना सतावत असते. दुसरीकडे राम नदी पार करत असतात. त्याचवेळी अखेरचा श्वास घेताना दशरथ रामांचे नाव पुकारतात. दशरथांची हाक ऐकू आल्याप्रमाणे राम अचानक मागे वळून पाहतात. अयोध्येतील वडिलांची आर्त हाक जणू त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचा भास या दृश्यातून निर्माण होतो. पिता-पुत्रांच्या विरहाचा हा क्षण प्रेक्षकांना भावूक करणारा ठरतो.