अनिल कांबळे
नागपूर,
scam ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी वंजारीनगरातील निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला ४५ लाख ६९ हजार १८७ रुपयांनी गंडा घातला. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून आरोपींनी त्यांना ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. बनावट नफ्याचे आकडे दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वळते करून घेतले. सुनील प्रभाकर शिरपूरकर (६८) असे फसवणूक झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते वंजारीनगर परिसरात राहतात. ३० सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या scam माहितीनुसार, आरोपींनी व्हॉट्सॲपच्या दोन क्रमांकांवरून तसेच 'itsmebarbiet447868233590' आणि 'Adityaverma123' या नावांनी टेलिग्रामवरून शिरपूरकर यांच्याशी संपर्क साधला. ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी फायनान्स ॲपच्या डिस्कव्हर विभागातून उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांच्या लिंक पाठविण्यात आल्या. आरोपींनी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीतून मोठा नफा होत असल्याचे बनावट आकडे दाखविले. त्यामुळे शिरपूरकर यांचा विश्वास बसला. त्यांनी आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये अनेक व्यवहारांतून एकूण ४५ लाख ६९ हजार १८७ रुपये ५० पैसे जमा केले. मात्र, प्रत्यक्षात आश्वासन दिल्याप्रमाणे नफा मिळाला नाही आणि गुंतवणुकीची रक्कम काढता आली नाही. पैसे परत मिळविण्याचे प्रयत्न करूनही आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासह रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये वळती झाली, याचा तपास सुरू आहे.