चेन्नई
tamil nadu दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देण्यासाठी तमिळनाडू सरकारने विशेष योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अवघ्या १०० रुपयांत १० प्रकारच्या आवश्यक वस्तूंचा समावेश असलेले भाजीपाला पॅकेज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 'वेत्री स्पेशल व्हेजिटेबल पॅकेज' असे या योजनेचे नाव असून, सहकार विभागाच्या माध्यमातून तिची अंमलबजावणी केली जात आहे. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील निवडक २१८ सहकारी विक्री केंद्रांवर नागरिकांना या पॅकेजची खरेदी करता येणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. चेन्नईतील पूंगा नगर को-ऑपरेटिव्ह होलसेल स्टोअरच्या १५व्या मेन रोडवरील विक्री केंद्रातून या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी चेन्नईत भाजीपाला विक्री करणाऱ्या चार मोबाइल व्हॅनही तैनात करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पॅकेजमध्ये साधारण २.५५ ते २.६० किलो भाजीपाला आणि स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामध्ये ५०० ग्रॅम कांदे, ५०० ग्रॅम टोमॅटो, २५० ग्रॅम वांगी, २५० ग्रॅम बटाटे, २०० ग्रॅम गाजर, २०० ग्रॅम फरसबी, १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १०० ग्रॅम लिंबू आणि ५० ग्रॅम आले देण्यात येणार आहे. याशिवाय ४०० ते ४५० ग्रॅम वजनाचे एक नारळही या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन स्वयंपाकाच्या गरजा लक्षात घेऊन या वस्तूंची निवड करण्यात आली आहे.
भाजीपाल्याचा ताजेपणा आणि दर्जा टिकवण्यासाठी खरेदीपासून पॅकिंगपर्यंत स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आवश्यक भाज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अधिकाधिक कुटुंबांना याचा लाभ मिळावा आणि काही मोजक्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीला केवळ एकच पॅकेज खरेदी करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
या तीन दिवसीय उपक्रमासाठी सहभागी सहकारी केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित केंद्रांच्या नियमित कामकाजाच्या वेळेत नागरिकांना हे पॅकेज खरेदी करता येणार आहे. तसेच खरेदी केंद्रे आणि किरकोळ विक्री केंद्रांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीच्या गर्दीत भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठीही प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
सणासुदीच्या काळात भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चावर अतिरिक्त भार पडतो. ही बाब लक्षात घेऊन तमिळनाडू सरकारने १०० रुपयांत भाजीपाला पॅकेज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ७ नोव्हेंबर रोजी ही विशेष विक्री संपणार असल्याने त्यापूर्वी नागरिकांनी अनुदानित दरातील या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.
दरम्यान, यापूर्वीही मुख्यमंत्री विजय यांनी एका विशेष उपक्रमातून लक्ष वेधले होते. बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थिनीला त्यांनी सोन्याचा हार भेट दिला होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भावनिक आवाहनही केले होते.