उत्तराखंड
uttarakhand road accident उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. गंगनानीजवळ डबराणीकडे जात असलेली इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळून थेट भागीरथी नदीत पडली. या वाहनात चालकासह सात जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर दोन महिला अद्याप बेपत्ता आहेत. वाहनातील प्रवासी गुजरातचे रहिवासी असल्याची माहिती आहे. हे सर्वजण गंगोत्री धामच्या दर्शनासाठी निघाले होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत नदीकिनाऱ्यावरून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी असलेल्या एका तरुणाला सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने अन्य रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातात अशोकबेन पटेल (४९), रुतिका अशोकभाई पटेल (१९) आणि घनश्यामभाई सरवालिया (३२) या गुजरातमधील रहिवाशांसह वाहनचालक राहुल अग्रवाल (हरिद्वार) यांचा मृत्यू झाला आहे. वेदांत अशोकभाई पटेल (१७) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुधाबेन अशोकभाई पटेल (४५), रा. सूरत आणि किरणबेन विशालभाई पटेल (३४), रा. सुरेंद्रनगर या दोघी बेपत्ता आहेत.
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी भागीरथी नदी आणि आसपासच्या संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. एसडीआरएफसह अन्य बचाव पथकेही या मोहिमेत सहभागी असून, बेपत्ता महिलांचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.