अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या प्रतिक्रीया

    दिनांक :01-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
budget-2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज रविवार १ रोजी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवरांनी साधक-बाधक प्रतिक्रीया व्यत केला.
 
 
budget-2026
 
देशाला आत्मनिर्भर बनविणारा अर्थसंकल्प : आ. कुणावार
 
 
हिंगणघाट : देशाला आत्मनिर्भर व विकसित बनविण्यासाठी त्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे हा अर्थसंकल्प असल्याचे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यत केले. शेतकरी, महिला व युवक या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवून सबका साथ, सबका विकास या ध्येयाने तयार केलेला हा अर्थसंकल्प असल्याचेही ते म्हणाले.
...............
 
विकसित भारताच्या संकल्पनेला दिशा देणारा : आ. वानखेडे
 
 
आर्वी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेला सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पांना नवी दिशा देणारा आहे. कर्तव्य भवनातून मांडलेला हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक विकासाचा आराखडा नसून सामान्य जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करणारा कर्तव्य दस्तऐवज आहे. भारताला जागतिक एसपोर्ट हब बनवणे, बायो-फार्मासाठी १० हजार कोटींची तरतूद आणि कॅन्सर-मधुमेहाची औषधे स्वस्त करणे यांसारख्या निर्णयांतून सर्वसामान्यांचे आरोग्य आणि आर्थिक उन्नती यांचा विचार करण्यात आला आहे. १५ हजार शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब आणि महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेच्या माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या सूत्राला धरून मांडलेला हा अर्थसंकल्प भारताला समृद्धीच्या शिखरावर नेणारा ठरेल, असा विश्वासही आ. वानखेडे यांनी व्यत केला.
..................
 
सर्वसमावेशक विकासाचा भकम आराखडा :तडस
 
 
देवळी : केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी, शेतकरी, मध्यमवर्ग, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि उद्योग क्षेत्राच्या सशतीकरणासाठी महत्त्वपूर्ण व दूरदृष्टीपूर्ण ठरणारा आहे. ग्रामीण सोबतच शहराचा विकास, गृहउद्योग, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक विकासाचा भकम आराखडा असल्याची प्रतिक्रीया माजी खासदार रामदास तडस यांनी दिली.
................
 
 
संतुलित, संवेदनशील व सर्वसमावेशक अर्थसंकल्प :—राजेंद्र भुतडा
 
 
वर्धा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प संतुलित, संवेदनशील व सर्वसमावेशक आहे. आर्थिक तूट कमी करत देशावरील कर्ज कमी करून आगामी वर्षांत ते ५० टयांपर्यंत आणण्याचा उद्देश हा अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा संकेत आहे. आयकरातील वाद कमी व्हावेत याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून, लहान करदात्यांना सुलभता मिळावी यासाठीच्या योजना विचाराधीन आहेत. भांडवली खर्चाच्या माध्यमातून तसेच एमएसएमईला प्रोत्साहन, डेटा सेंटरची स्थापना, कॉर्पोरेट मित्र, मार्गदर्शक प्रशिक्षण यांद्वारे रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही महत्त्वाची पावले आहेत. देशात मेडिकल टुरिझम हब विकसित करणे, प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे, आयुर्वेदाचा विकास असे अनेक चांगले प्रस्ताव या अर्थसंकल्पात असल्याची प्रतिक्रीया सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा यांनी दिली.
...............
 
विकसित भारताकडे वाटचाल करणारे अंदाजपत्रक : नगराध्यक्ष तुळसकर
 
हिंगणघाट : विकसित भारताकडे देश अधिक वेगाने वाटचाल करण्यासाठी विविध उपाययोजना असणारे हे अंदाजपत्रक असून हे बजेट महागाईवर नियंत्रण ठेवणारे असल्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय महिलांना समाधान देणारे आहे. छोट्या गावांच्या विकासासाठी या बजेटमध्ये विशेष प्रावधान करण्यात आले असून सामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेऊन हे बजेट तयार करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी दिली.
..............
 
 
विकासाचे गाजर दाखवून जनतेची फसवणूक : अतुल वांदिले
 
 
हिंगणघाट : विकासाच्या नावावर बेरोजगार युवक, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांची दिशाभूल करणारा हा अनर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार तर झोपडपट्टीत राहणार्‍यांचे जीवनमान खालवणार आहे, अशी प्रतिक्रिया राकाँ शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिली आहे. हे बजेट केवळ धुळफेक असून महागाई वाढविणारे असल्याची टीका अतुल वांदिले यांनी केली.
..............
 
 
पण, शेतकर्‍यांना अधिक सवलतीची गरज : अ‍ॅड. कोठारी
 
 
हिंगणघाट : यंदाचे केंद्र सरकारचे अंदाजपत्रक हे विकसित भारताचे स्वप्न पाहणारे असले तरी या अंदाजपत्रकातून मात्र शेतकरीवर्गाची उपेक्षा करण्यात आलेली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात अतिवृष्टीने संपूर्ण भारतात शेतकर्‍यांचे फार नुकसान झालेले आहे. शेतमालाला बाजारपेठेत भाव नाही. त्यामुळे हे अंदाजपत्रक हे विकसित भारताचे स्वप्न पाहणारे असले तरी शेतकरी वर्गाची उपेक्षा झाल्याचे मत अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी व्यत केले आहे.
...............
 
 
तुट कमी केली, पण विकास कापूनच : चारुलता टोकस
 
 
वर्धा : आजच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात महसूल घसरतोय, अर्थव्यवस्था मंदावतेय, राजस्व आणि कर मिळकत मोठ्या प्रमाणात कमी, हा थेट मंदीचा इशारा आहे. सरकारने गुंतवणूक कमी केली म्हणजे भविष्यातील वाढ थांबवली. आरोग्य, शिक्षणावर कात्री लावण्यात आली आहे. शिक्षण, शेती व ग्रामीण भागाला पाहिजे तसा न्याय या अर्थसंकल्पात देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने तुट कमी केली, पण विकास कापूनच, अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष चारुलता टोकस यांनी दिली.
................
 
 
देश मजबुतीकडे नेणारा अर्थसंकल्प : प्राचार्य डॉ. सोनटके
 
आर्वी : आजच्या अर्थसंकल्पामध्ये वैयतिक नागरिक म्हणून विशेष काही दिसत नसले तरी देशामध्ये पायाभूत सुविधा, सेवा क्षेत्र व संरक्षण यामध्ये देश मजबूत होईल याकडे लक्ष दिल्या जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये एआय शिक्षण दिल्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारून नवीन पिढी घडविणे, मुलींच्या शिक्षणावर परत भर देण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह होणार आहे. आयकर दर व स्लॅब मध्ये काही बदल नाही, पण आयकर प्रणालीमुळे काही कलम रद्द झाले आणि आयकर विवरण सुटसुटीत राहणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित फार काही नाही पण कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान यावं. एआयचा वापर व्हावा तसेच पशुपालक, दुग्ध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. सागरी किनारपट्टीच्या शेतकर्‍यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कॅन्सर व मधुमेह या आजारावरील औषध स्वस्त होईल, त्याचा मात्र फायदा सर्वसामान्यांना होईल. या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन क्षेत्राच्या विकासावर सुद्धा भर दिला आहे, अशी प्रतिक्रीया प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटके यांनी दिली.
...................
 
 
ग्रामीण विकासाला मजबुती मिळणार : गोकुळ व्यास
 
 
वर्धा : पुरातन काळातील अर्थ तंत्राची जाण ठेवत कृषी विकासाचा पाय मजबूत करण्याकरिता चंदन, काजू, बादाम, बांबू या शेतीतून शेतकरी उत्पन्नामध्ये मोठी वाढ होवू शकते. नगर विकास बाँडच्या माध्यमातून शहरी विकासाला गती मिळणार आहे. १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याने ग्रामीण विकासाला मजबुती मिळणार असून ग्रामपंचायतींना विकासासाठी जास्त निधी उपलब्ध होतील. अर्थसंकल्प ग्राम विकास ते देश विकास संकल्पना साकार होण्यास मोठी भूमिका ठरणार असल्याची प्रतिक्रीया युवा वास्तुविशारद गोकुळ व्यास यांनी दिली.