मुंबई,
Dhurandhar OTT release तब्बल २५० ते २८० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या आणि २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने आता ओटीटीवरही नवा इतिहास रचला आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनित हा अॅक्शन ड्रामा ३० जानेवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला आहे.
५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने मोठ्या पडद्यावर प्रचंड यश मिळवत जगभरात सुमारे १३०० कोटी रुपयांची कमाई केली होती. गाणी, दमदार संवाद, प्रभावी कथाकथन आणि भव्य साहसदृश्यांमुळे या चित्रपटाची देश-विदेशात जोरदार चर्चा झाली. थिएटरमध्ये सुमारे ३ तास ३४ मिनिटांचा रनटाइम असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
ओटीटीवर मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक आदित्य धर यांनी आनंद व्यक्त केला. “धुरंधर नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करताना पाहून मला खूप आनंद झाला आहे. प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहाने हा चित्रपट पहावा, या उद्देशानेच त्याची निर्मिती करण्यात आली होती. मोठ्या पडद्यावर असो किंवा घरच्या घरी ओटीटीवर, चित्रपटाचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचा मी आभारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
मात्र, या यशासोबतच ओटीटी व्हर्जनबाबत काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, ओटीटीवर अनकट व्हर्जन अपेक्षित होते, परंतु उपलब्ध व्हर्जन थिएटरपेक्षा सुमारे नऊ मिनिटांनी कमी आहे. थिएटरमध्ये ३ तास ३४ मिनिटांचा असलेला चित्रपट ओटीटीवर फक्त ३ तास २५ मिनिटांचा असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय काही संवाद म्यूट करण्यात आल्याचाही उल्लेख प्रेक्षकांनी केला आहे.काही प्रेक्षकांनी ओटीटीवरील चित्रपटाचा रंग आणि दृश्यगुणवत्तेबाबतही असमाधान व्यक्त केले असून, रंग फिकट वाटत असल्याने थिएटर रेकॉर्डिंगच्या पायरेटेड प्रिंटसारखा अनुभव येत असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे ट्रेंडिंग असूनही ‘धुरंधर’च्या ओटीटी व्हर्जनवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि बालकलाकार सारा अर्जुन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. थिएटरनंतर ओटीटीवरही चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.