नवी दिल्ली,
Important schemes for the education sector केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाच्या अनेक पैलूंवर भर दिला तसेच शिक्षण क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या. या घोषणांमध्ये पाच नवीन विद्यापीठ टाउनशिपची उभारणी, प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्था आणि एम्ससारखी तीन नवीन आयुर्वेदिक रुग्णालये बांधण्याचा समावेश आहे.
अर्थसंकल्पात पशुवैद्यकीय डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच, ‘शिक्षण ते रोजगार आणि उद्योग’ या उच्च अधिकार असलेल्या स्थायी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला गेला आहे. ही समिती विकसित भारताच्या दृष्टीने सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार्या उपाययोजनांची शिफारस करेल. निर्मला सीतारमण यांनी शिक्षण आणि कौशल्य विकासासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हब तयार करण्याचे उद्दिष्ट सांगितले, ज्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि शहरांमध्ये आर्थिक क्षेत्रांची स्थापना होईल. या योजना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांमध्ये भारताच्या भविष्याचा पाया मजबूत करतील, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.