रोखठोक...
दिनेश गुणे
politics राजकारण हे काळासारखे असते. काळ कोणासाठी कधी थांबत नाही असे म्हणतात. राजकारणही तसेच असते. ते कोणासाठी कधी थांबत नाही. ‘याल तर बरोबर, नाही तर तुम्हाला सोडून, तुमच्याशिवाय’ असा खाक्या असलेले राजकारणही कधी थांबत नाही. ते काळासारखे पुढेच जात असते. त्यामुळे, राजकारणात वावरणाèया प्रत्येकाला एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. राजकारणाचे बोट धरून पुढे चालायचे आणि ते बोट सुटू द्यायचे नाही, याचे भान प्रत्येकास जपावे लागते. एकदा ते बोट सुटले, की त्याला पुन्हा पुढे जाऊन राजकारण गाठता येत नाही. म्हणूनच, राजकारण अनाकलनीय असते, असेही म्हणतात. त्याला संवेदना नसतात, असेही दिसून येते. त्याच्याविषयी अनेक प्रवाद, चर्चा, समजुती, अफवा वगैरे आहेतच! थोडक्यात, राजकारण हे हत्ती आणि चार आंधळे या गोष्टीसारखे असते. राजकारणाबाबत ज्याचा जसा अनुभव, तसे ते त्यास दिसते आणि ते तसेच असते असा त्याचा ठाम विश्वास असतो. काहींना ते वाळूसारखे दिसते. ही वाळू मुठीत पकडली, तरी निसटून जाण्याचा प्रयत्न करत असते. काहींना ते पायाखालच्या वाळूसारखे भासते. त्यावर स्थिर उभे राहणे ही मोठी कसरत असते. पायाखालची वाळू सरकू नये यासाठी ती कसरत करणे भागच पडते, तसेच राजकारणातही करावे लागते. काहींना राजकारण म्हणजे घोडेस्वारी वाटते.
घोड्यावर पक्की मांड ठोकता आली नाही, तर अवखळ घोडा पाठीवरल्या स्वाराला झुगारून देतो आणि स्वैर उधळतो. तसेच राजकारणात ज्याला पक्की मांड ठोकता आली नाही, तो जायबंदीदेखील होऊ शकतो. काहींच्या बाबतीत, राजकारण म्हणजे अळवावरच्या पाण्यासारखे असते. समोर असेपर्यंत अळवावरच्या पाण्याचा थेंब मोत्यासारखा चकाकत भुरळ घालतो, म्हणून तो बोटात पकडण्याचा मोह अनावर होऊन हात घालावा, तर अचानक गळून जमिनीवर पडतो व बघता बघता मातीत मुरूनही जातो. काहींच्या बाबतीत राजकारण हे सट्ट्यासारखे असते. नशिबाने साथ दिली, तर अचानक लॉटरी लागते आणि बघता बघता रंकाचा राव होऊन जातो, तर अनेक जण रावाचे रंकदेखील होऊन जातात. सट्ट्याचा नाद वाईट असतो. त्यामध्ये हार पत्करावी लागली, तर जिद्द जागी होते आणि गमावलेले सारे काही पुन्हा मिळविण्याच्या ईर्ष्येने पुन्हा पुन्हा आपले डाव नव्याने खेळताना आणखीनच काही गमावण्याचीही वेळ येते. जवळचे सारे काही संपल्यानंतरही, सट्टा खेळण्याचे व्यसन स्वस्थ बसू देत नाही. राजकारणातही तसे काही जण दिसतात. काहींना वारसा मिळूनदेखील नशीब साथ देत नाही, तर काहींना मिळालेल्या वारशाची पुण्याई फळाला येत नाही. काही जण या पुण्याईचे तुणतुणे वाजवत राजकारणाच्या वेगासोबत पळण्याचा प्रयत्न करतात आणि काही जणांना दमछाक होऊनही पळणे थांबविताच येत नाही. काही जण ही स्पर्धा मध्येच सोडून देतात, तर काही जणांना राजकारणच स्पर्धेतून बाद करून टाकते. असे कितीतरी जण राजकारणाच्या स्पर्धेतून बाद होऊन गेले आहेत. राजकारणाचा हा हत्ती आपल्या चालीने पुढेच जात असतो, म्हणूनच ते अनेकांना अनाकलनीय वाटत असते. काळ पुढे सरकतो, तसे राजकारणही पुढे सरकत असले, तरी ते घड्याळासारखे असते. घड्याळाचे काटे पुढे सरकत असले, तरी फिरून प्रत्येक ठरावीक काळानंतर तीच वेळ पुन्हा दाखवतात. म्हणून घड्याळाचे काटे मागे फिरवता येत नसतानाही, कालची वेळ पुन्हा येऊ शकते, हे राजकारणाचे वैशिष्ट्य असते. या प्रत्येक अनुभवातून राजकारणात उतरलेला कोणी ना कोणी सातत्याने जातच असतो.
गेल्या काही दशकांतील देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे सारे रंग अनुभवले आहेत. शोभादर्शक जितक्या वेळा फिरवावा, तेवढ्या वेळा त्यामध्ये आकर्षक चित्ररंग दिसतात. प्रत्येक चित्र नवे, पहिल्याहून वेगळे असते. पण कधीतरी मात्र, एखादे अगोदरचे चित्र पुन्हा उमटते. तसे क्वचितच होत असले, तरी तसे होते. राजकारणातही तसे दिसते. एखादे चित्र नव्याने पाहत असल्यासारखे वाटत असले, तरी तीच चित्रे अगोदर कधीतरी दिसलेली असतात. असा अनुभव प्रत्यक्षातही कधीतरी येतो. एखादी घटना डोळ्यांसमोर घडते, तेव्हा तशीच घटना पूर्वी कधीतरी, प्रत्यक्षात किंवा ऐकिवात घडल्याची जाणीव होते आणि हे सारे आपण अनुभवलेले आहे, हेही जाणवते. गेल्या काही दिवसांत राजकारणात घडत गेलेल्या घडामोडी पाहता, असेच काहीसे अनुभवास येऊ लागले आहे. ते अनाकलनीय असले, तरी तसे घडणे नवे नाही. राजकारण कोणासाठी थांबत नसले, तरी एखाद्याचे बोट सुटल्यानंतर दुसरे कोणीतरी ते बोट पकडून राजकारणासोबत पुढे चालत राहतो. राजकारणाच्या अलिकडच्या इतिहासात तसे अनेकदा घडले आहे. काही वेळा, राजकारणाचे बोट रिकामे राहू नये यासाठी त्यासोबत धावणारे अनेक जण अन्य कोणास बरोबर घेतात आणि सामुदायिकरीत्या राजकारणासोबत पुढची वाटचाल सुरू होते. नव्याने राजकारणाचे बोट धरणारा कधीतरी पुढच्या वाटचालीत अडखळतो. त्याला अशा वाटचालीची सवयही नसते. तो भांबावतो. तसे होणे अनपेक्षित नसते. उलट, तसाच नवखा कोणी पुढच्या वाटचालीत सोबत आला, तर अनेकांस आनंदही होतो.
तो अर्ध्यावर बोट सोडेल, थकेल, पुढची वाट चालण्याआधीच थांबेल आणि पुन्हा कोणी नवखा नवे बोट पकडून सोबत येईल, अशा अपेक्षेने पुढची वाटचाल सुरू होते. प्रत्यक्षात मात्र, राजकारणाच्या पुढच्या चालीमध्ये असे सहसा होत नाही. एखादे बोट सुटलेच, तर ते बोट पकडून पुढे वाटचाल करणारा गडी नव्या दमाचा असेल, तर त्याची वाटचाल अधिक दमदारही होते आणि ज्या अपेक्षेने त्याला सोबत घेण्याची धडपड होते, तोच धोबीपछाडही देतो, याची जाणीव ठेवावी लागते. गेल्या काही दशकांत असे घडले आहे. हा इतिहास फार जुना नाही. तो विस्मरणातही गेलेला नाही. तो आठवणींच्या कप्प्यात घट्ट रुतून राहिलेला आहे. फक्त तो वारंवार समोर येत नाही. जेव्हा समोर येतो, तेव्हा त्याला घासूनपुसून स्वच्छ करावे लागते.
महाराष्ट्राच्या अलिकडच्या घडामोडी पाहता, राजकारणातील आठवणींचा तो कप्पा पुन्हा उघडला जात असल्याचे दिसते. राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 18 तारखेपासून सुरू होत आहे. राज्याचा नवा अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाईल. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर रिक्त झालेल्या पदामुळे राजकारणातील घडामोडींच्या इतिहासाचे ते जुने रंग नव्याने दिसू लागले आहेत. अजितदादांचे निधन हा पवार कुटुंबावरील मोठा आघात आहे. महाराष्ट्रालाही तो अनपेक्षित धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांच्या रिक्त पदावरील नव्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली. ते साहजिकही होते. कारण राजकारण कधी कोणासाठी थांबत नसते. अजितदादांचे बोट सुटल्यावर ते बोट धरणारे नवा हात लगेचच येणार हे गृहीतच होते. आता नव्या राजकारणाची सुरुवात झाली आहे.politics राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदावर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होऊन राजकारणाची पुढची वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या जेमतेम चार दिवसांतील या घडामोडी भावनिकदृट्या काहीशा असंवेदनशील वाटत असल्या, तरी राजकारणात संवेदनशीलतेपेक्षा व्यवहार्यतेला अधिक महत्त्व असते. सरकारमधील रिक्त पदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होणार हे स्पष्ट झाल्यानंतर समाजात काही नापसंतीचे सूर उमटले. निधनानंतर दोन-तीन दिवसांतच नव्या राजकीय रणनीतीला वेग आला. अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा गट यांच्यात याच दरम्यान विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सुरू झाल्या होत्या.
येत्या 12 फेब्रुवारीस विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरले होते, असे शरद पवार गटातील नेत्यांचे म्हणणे होते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास संमती दिल्याने, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया थांबल्याचे मानले जात आहे. या प्रक्रियेस खीळ बसल्याने, शरद पवार यांच्या गटास राजकीय शह मिळाल्याचीही चर्चा होत आहे. कदाचित त्यामुळेच, अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावरील नियुक्तीचा निर्णय तातडीने झाल्याचे दुःख व्यक्त होत असावे. राजकारण कोणासाठी थांबत नसते, हा इतिहासाचा दाखला पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. राजकारणाच्या वेगासोबत धावणे जमले नाही, तर ज्याने राजकारणाचे बोट अगोदर पकडले, त्याला सोबत घेऊनच ते पुढे चालत असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अजितदादांच्या निधनाचा आघात असह्य आहे, हे खरेच आहे. त्यांच्या निधनामुळे राजकारणाचे आडाखेही बदलले आहेत, समीकरणे बिघडली आहेत, हेही खरे आहे. पण नव्या समीकरणांची मांडणी करून त्याप्रमाणे राजकारणाची दिशा ठरविणे हे एक कौशल्य असते. त्याचीही पुन्हा एकदा प्रचीती आल्याने, इतिहासातील दाखले पुन्हा एकदा लख्खपणे समोर आले आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर काही तास उलटण्याआधीच नव्या उपमुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर, अनेकांनी नापसंती व्यक्त केली. सत्तेच्या राजकारणातील एखादा बिनीचा मोहरा अनपेक्षितपणे काळाच्या पडद्याआड गेला, तर त्यामुळे निर्माण होणारी पोकळी फार काळ तशीच ठेवता येत नाही. ती लवकरात लवकर भरून काढली गेली नाही, तर अनागोंदी माजण्याचीच शक्यता अधिक असते, हेही काही जुन्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. कारण राजकारण हा अत्यंत गतिमान खेळ असतो. भावनेला यामध्ये महत्त्वाचे स्थान नसते. या खेळाच्या गतीसोबत जुळवून घेता आले नाही, तर मागे पडावेच लागते. गेल्या शतकात, 31 ऑक्टोबर 1984 या दिवशी सकाळी देशावर असाच एक अनपेक्षित आघात झाला होता. त्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या सुरक्षा पथकातील मारेकèयांनी गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने एम्स इस्पितळात हलविण्यात आले, पण दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या निधनाची वार्ता अधिकृतपणे घोषित केली गेली. लगेचच काँग्रेस कार्यकारिणीची तातडीची बैठक झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी पावणेसात वाजता, इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आईचा देह शवागारात असताना, तोवर राजकारणापासून दूरच राहिलेल्या पोटच्या मुलास या अवघड जबाबदारीचा भार शिरावर घ्यावा लागला. इंदिरा गांधींच्या निधनानंतर, तीन दिवसांनी त्यांच्या पार्थिवावर पंतप्रधान राजीव गांधी यांनी अन्त्यसंस्कार केला. आजच मृत्यू झाला, त्यांचा अन्त्यसंस्कारही झाला नाही, लगेच नेतृत्वाच्या चर्चा कशाला, वगैरे चर्चांना तेथे स्थान नव्हते. राजकारणाच्या इतिहासातील अशा घटनांमध्ये, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रभावशाली नेत्याच्या अनपेक्षित निधनामुळे राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. अशा घटनांमुळे केवळ नेतृत्वच बदलले नाही, तर अनेकदा नवी धोरणे, नवी समीकरणे आणि नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. इंदिरा गांधी यांच्या निधनाआधी 1966 मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ताश्कंदमध्ये करारावर स्वाक्षऱ्या केल्याची बातमी देशात पोहोचली आणि पाठोपाठ त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने देश हादरला. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय झाला.
पण यामुळेच काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला. जुने नेते आणि तरुण पिढीमध्ये धुमसलेल्या वादातून 1969 मध्ये काँग्रेस दुभंगली. राजीव गांधींच्या हत्यनेनंतरही देशाच्या आणि काँग्रेसच्या राजकारणाला अशीच कलाटणी मिळाली. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे निकालाचे पारडे फिरले आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. या घडामोडीनंतर देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला. गांधी-नेहरूंच्या प्रतिमेपलीकडील काँग्रेसच्या उदयाचा प्रारंभ झाला. राजकारण कोणासाठी थांबत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले.
अशा अनेक घडामोडींनी भारताचे राजकारण रंगलेले आहे. आंध्र प्रदेशात 2009 मध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे, मुख्यमंत्री असताना हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आणि आंध्र प्रदेशात राजकीय अस्थिरता जागली. तेलंगणा राज्यनिर्मितीच्या हालचालींना त्यातूनच वेग आला आणि आंध्र प्रदेशाचेच विभाजन झाले. वायएसआर यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. तामिळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतरही तेथील राजकारण असेच अनपेक्षितपणे बदलले. त्यांच्या अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षात मोठी फूट पडली आणि तामिळनाडूच्या राजकारणातील एक ‘बलाढ्य पर्व’ संपुष्टात आले. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजप आणि इतर राजकीय पक्षांना वाव मिळाला.
राजकारणातील एखाद्या व्यक्तीचे जाणे हा केवळ एखाद्या कुटुंबावरील आघात असतोच, पण राजकारणाच्या दृष्टीने राजकीय व्यवस्थेचाच तो एक टर्निंग पॉईंटदेखील ठरतो. इतिहासातील अशा घडामोडींमुळे पक्ष फुटले, नवी समीकरणे तयार झाली, नवे नेतृत्व निर्माण झाले आणि सामाजिक स्तरावरही काही उलथापालथ झाली. शास्त्रीजींच्या निधनानंतर, राजकारणातील साधेपणा हरवल्याची सामाजिक भावना होती. त्यांनी दिलेला ‘जय जवान जय किसान’ हा नारा पुढे हरित क्रांतीचा प्रणेता ठरला आणि हरित क्रांती यशस्वी करण्याची प्रेरणा शेतकऱ्यामध्ये रुजली. इंदिरा गांधींच्या पदग्रहणानंतर देशाने स्त्री नेतृत्वाचा स्वीकार केला आणि भारतीय स्त्रियांच्या मानसिकतेत आत्मविश्वास रुजत गेला. महिलांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वशैलीवर मान्यतेची मोहर उमटली. राजीव गांधींच्या निधनानंतर मध्यमवर्गात मोठी स्थित्यंतरे घडताना दिसू लागली. समाज एका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर दाखल झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातही, सामाजिक आणि राजकीय घडी बदलून टाकणाऱ्या अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत. घराणेशाहीचा उदय, प्रस्थापित कौटुंबिक राजकारणापासून दूर गेलेले सत्ताप्रवाह, जातीय ध्रुवीकरणे, असे काही बदल महाराष्ट्राने अनुभवले आहेत. राजकारण कोणासाठी थांबत नाही, ते प्रवाही असते, हेच त्याचे कारण आहे.