खासगी आयुष्यातील संघर्ष, तरीही अभिनयाच्या शिखरावर तब्बू

01 Feb 2026 11:25:41
मुंबई,
Tabu बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान आणि संवेदनशील अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी तबू आजही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. यशस्वी कारकीर्द, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली प्रशंसा आणि अनेक अजरामर भूमिका असल्या तरी तिचं खासगी आयुष्य मात्र वेदनादायी अनुभवांनी भरलेलं राहिलं आहे. वयाच्या ५४व्या वर्षीही तबू अविवाहित असून, आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर तिला एकटेपणाचा सामना करावा लागला.
 

Tabu 
तबूचं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे. मात्र चित्रपटसृष्टीत ती ‘तबू’ या नावानेच ओळखली जाते. प्रेम तिच्या आयुष्यात आलं, नाती जुळली, पण कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. याशिवाय, तिच्या आयुष्यात वडिलांची साथ कधीच लाभली नाही. तबूने कधीही वडिलांचं नाव स्वतःच्या नावासोबत लावलं नाही, एवढंच नव्हे तर त्यांना भेटण्याची इच्छाही कधी व्यक्त केली नाही.
एका मुलाखतीत तबूने तिच्या बालपणाबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, तिचं बालपण साधं पण संस्कारक्षम वातावरणात गेलं. हैदराबादमध्ये ती मोठी झाली. वडील आणि आई यांचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई आणि आजोबांकडे राहत होती. आई शिक्षिका असल्यामुळे बहुतेक वेळ आजीच तिची काळजी घ्यायची. प्रार्थना, अभ्यास आणि शिस्तीच्या वातावरणात ती मोठी झाली. लहानपणी ती खूप बुजरी होती, स्वतःचा आवाज नसल्यासारखं वाटायचं, पण अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर तिला आत्मविश्वास मिळाला, असं तिने सांगितलं.
 
 
 
वडिलांच्या नावाचा Tabu वापर का केला नाही, यावरही तबूने स्पष्ट भूमिका मांडली होती. “मी कधीच वडिलांच्या नावाचा वापर केला नाही. तसं करावं, असं मला कधी वाटलंच नाही. माझ्यासाठी माझं नाव नेहमीच तबस्सुम फातिमा असंच राहिलं आहे. शाळेत फातिमा हेच माझं आडनाव मानलं जायचं. मला वडिलांबद्दल काहीच आठवत नाही. माझी बहीण कधीकधी त्यांना भेटली आहे, पण मला त्यांना भेटण्याची इच्छा कधीच झाली नाही. मी जशी मोठी झाले, ज्या वातावरणात वाढले, त्यात मी समाधानी आहे,” असं ती म्हणाली होती.तबू फक्त तीन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. तबूला फराह नावाची बहीण असून तीही काही काळ अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. अभिनयाची परंपरा घरात असतानाच तबूनेही या क्षेत्रात पाऊल ठेवलं. १९९१ मध्ये तिने एका तेलुगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली, तर १९९४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
व्यक्तिगत आयुष्यात अनेक पोकळ्या आणि वेदना असूनही, अभिनयाच्या जोरावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी तबू आजही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. तिची कारकीर्द ही केवळ यशाचीच नाही, तर संघर्षातून घडलेल्या आत्मविश्वासाची कहाणी आहे.
Powered By Sangraha 9.0