ट्रफल्स ते पिस्ता आइस्क्रीम; बडोद्याच्या महाराजांचा १८९७ सालचा मेनू उघड

10 Feb 2026 12:41:31
बडोदा,
1897 menu of the Maharaja of Baroda इतिहासाच्या पानांत कधी कधी अशा गोष्टी सापडतात ज्या आजच्या काळालाही थक्क करून सोडतात. असाच एक तब्बल १२८ वर्षे जुना शाही जेवणाचा मेनू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बडोद्याच्या महाराजांनी दिलेल्या या भव्य मेजवानीचा मेनू अलीकडेच उजेडात आला असून, त्या काळातील राजघराण्यांचे ऐश्वर्य आणि खाद्यसंस्कृती याची अनोखी झलक यातून दिसून येते. दक्षिण आशियातील मुघलकालीन इतिहासाच्या अभ्यासक नेहा वर्माणी यांनी अभिलेखागारात संशोधन करत असताना हा दुर्मिळ दस्तऐवज शोधून काढला. ३१ जानेवारी १८९७ रोजी बडोद्याच्या महाराजांनी ग्वाल्हेरच्या महाराजा सिंधिया यांच्या सन्मानार्थ ही शाही मेजवानी आयोजित केली होती. हा समारंभ गुजरातमधील ब्रिटिशकालीन लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये पार पडला होता.
 
 
 
meanu
 
या जेवणाचा मेनू पाहता, तो पूर्णपणे फ्रेंच ‘हौट क्युझिन’ शैलीत तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. ट्रफल्स, आर्टिचोक, कस्टर्ड आणि विविध पाश्चात्य पदार्थांचा समावेश असलेला हा मेनू त्या काळातील भारतीय राजघराण्यांचे पाश्चात्य जीवनशैलीशी असलेले नाते अधोरेखित करतो. नेहा वर्माणी यांनी हा फोटो शेअर करताना नमूद केले की, या मेजवानीतील पदार्थ भारतीय असतील अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात ती फ्रेंच नावांनी आणि लक्झरी घटकांनी सजलेली होती. मेनूमध्ये बदामापासून तयार केलेले कस्टर्ड, मेयोनेझ सॉससोबत शिजवलेली मासळी, ट्रफल्स घातलेले चिकन क्रीम सूप, इटालियन पद्धतीने बनवलेले मटणाचे कटलेट, मटारांसह भाजलेला तीतर, फ्रेंच सॉसमधील आर्टिचोक, भाजी-भाताची करी, मलाईदार सफरचंद आणि शेवटी पिस्ता आइस्क्रीम असा वैविध्यपूर्ण आस्वाद होता.
 
हा मेनू समोर येताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी भारतीय राजे युरोपियन अभिजात वर्गासारखेच ऐश्वर्यशाली जीवन जगत असल्याचे नमूद केले, तर काहींनी अशा मेजवानींचा उद्देश केवळ वैभव आणि प्रभाव दाखवणे हाच असल्याचे मत व्यक्त केले. १८९७ सालचा हा मेनू पाहून अनेकांना काळाच्या अंतराची जाणीव झाली असून, इतिहास किती वेगळ्या आणि समृद्ध कथा सांगतो याची पुन्हा एकदा आठवण करून देतो आहे.
Powered By Sangraha 9.0