ग्रीन हायवेज तयार करण्यासाठी एनएचएआयचा पुढाकार
नागपूर,
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वृक्षारोपण मोहिमेच्या जाऊन महामार्ग विकासाकरिता Green Highways ग्रीन हायवेज तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रमुख कॉरिडॉरवरील रिकाम्या जागांचा उपयोग करीत मियावाकी पद्धतीने झाडे लावली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली. नागपूर-हैदराबाद महामार्गावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील पहिले ’ऑक्सिजन बर्ड पार्क जामठा लगतच्या भागात एनएचएआयच्या जमिनीवर आहे. जे मध्य भारतात आढळणार्या पक्ष्यांच्या विविध प्रजाती आणि वनस्पती लक्षात घेऊन डिझाइन केले आहे.
हे पार्क विविध पक्ष्यांचे अधिवास
ऑक्सिजन बर्ड पार्क’ (अमृत महोत्सव पार्क) २८ सप्टेंबर २०२४ रोजी लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे पार्क विविध पक्ष्यांचे अधिवास म्हणून विकसित केले असून, येथे आंब्याचे, पेरूचे आणि चिंचेचे अनेक प्रकारचे झाडे लावली आहेत.
मोकळया जागेत वृक्षारोपण
Green Highways ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून जैवविविधता वाढवणे आणि शहराच्या कार्बन फूटप्रिंट कमी करणे हा मुळ उद्देश आहे. वन विभागाच्या मदतीने येथे वेगवेगळया ठिकाणी १८ हजार झाडे लावण्यात आली आहे. घनदाट परिसर तयार करणे, मोकळया जागेत वृक्षारोपण, नैसर्गिक तलाव, पक्ष्यांसाठी घरटी आणि निवारा केल्याने हे पार्क निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ ठरत असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी नंदकिशोर राउत यांनी दिली.
ऑक्सिजन बर्ड पार्क आश्रयस्थान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून एकूण १४.३२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प जवळपास २० एकरमध्ये आला आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणार्या वनस्पतींनी समृद्ध आहे. आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी या उद्यानात लावण्यात आली आहे. पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. केवळ ऑक्सिजन देणारा हा परिसर नव्हे तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी ऑक्सिजन बर्ड पार्क आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक शरद मेश्राम यांनी दिली.