झाडांना विषारी लस टोचून डिंकाची चोरी

10 Feb 2026 22:10:40
मेळघाटातील सालई वृक्षांवर संकट
धारणी, १० फेब्रुवारी
Gum theft मेळघाटच्या नैसर्गिक वनसंपदेवर परप्रांतीय व तस्करांचा डोळा लागलेला असून सागाचे लाकूड व सालई डिंकाच्या झाडावर संक्रांत आलेली आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात सागाचे वन भव्य प्रमाणात असल्याने अवैध वृक्षतोड लक्षात येत नाही. मात्र, वनोपज तस्करांनी पांढरी जंगली मुसळी, तिखाडी नावाचे सुगंधीत गवत व चंदनाची मौल्यवान झाडे मेळघाटातून हद्दपार केल्यावर आता तस्करांनी अवैध व अनैसर्गिक पद्धतीने सालई झाडांचा डिंक (गोंद)काढणे सुरू केल्याने सालईला पण धोका निर्माण झालेला आहे. मेळघाटातील सुसर्दा, बारातांडा, शिवाझिरी, रेल्वे धुळघाट, वान, रेल्वे तलई, भंवर, हिराबंबई, बिरोटी, पलसकुंडी, राणापिसा, लाक्टू, आंबाबारवा, सावलीखेडा, टेंभरूखेडा, गोलाईच्या जंगलात सालई डिंकाची झाडे मोठ्या प्रमाणात आजही जिवंत असली तरी मध्यप्रदेशातील इंजेक्शन फार्मूल्याने झाडांना धोका निर्माण होत आहे.
 

dink 
 
Gum theft  सालईच्या झाडातून प्राकृतिक पद्धतीने डिंक मिळविण्यासाठी खूप वेळ खर्ची घालावा लागतो. शिवाय थोडा-थोडा डिंक एकत्रित करण्यासाठी वारंवार जंगलात जावे लागते. यामुळे प्रतिबंधित किंवा राखीव आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात अनधिकृत प्रवेश करण्याचा धोका पण पत्करावा लागत असतो. या स्थितीमुळे इंजेक्शन टोचून भराभर डिंक काढण्याची पद्धत येथे रुजू झालेली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशासह देशातील अनेक राज्यात सालई डिंकाचे झाड कापण्यास, तोडण्यास, वाहतूक करण्यास किंवा डिंकाचे संग्रहण, वाहतूक, विक्री व खरेदी करण्यावर प्रतिबंध लावण्यात आलेले असल्याने सालई डिंकाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली आहे. इंग्रजीत बोसवेलिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या सालईच्या झाडापासून निघणारा डिंक विविध उपयोगात आणला जातो. गठीया रोगावर रामबाण उपाय म्हणून सालईचा उपयोग होतो. शरीरातील सूज कमी करण्यासाठी सालईतील विशेष औषधी गुणाचा उपयोग आयुर्वेदात करण्यात आलेला आहे. अस्थमा तथा जुन्या सुजसाठी सालईचा उपयोग होत असतो. गुणकारी अनेक औषधीत उपयोगी सालई डिंक राळ बनविण्यासाठी पण उपयोगी पडते. मात्र, सालईच्या झाडाला विषारी इंजेक्शन टोचून डिंक म्हणजे रस बाहेर काढला जातो. येथून म. प्र.च्या खंडवा, बर्‍हाणपूर आणि दामजीपुरा व भैसदेही शहरात सालईची तस्करी होत असते. वनविभाग व व्याघ्र प्रकल्पाने सालईच्या वनावर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे.
(एएम १० एफबी - सालई : सालईचे झाड)
Powered By Sangraha 9.0