पुणे,
pune-amrit-senior-citizen-scheme : पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ लोकप्रिय ठरत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ पर्यंत तब्बल ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. ७५ वर्षांवरील नागरिकांना सर्व एसटी बसेसमधून अमर्याद आणि मोफत प्रवास करण्याची सुविधा या योजनेतून मिळते.
या योजनेअंतर्गत नागरिकांनी ५८५ रुपयात स्मार्ट कार्ड घेतल्यानंतर संपूर्ण वर्षभर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करता येतो. पुणे एसटी विभागाला या योजनेतून ५४ कोटी ७१ लाखांहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले असून ही रक्कम महाराष्ट्र शासनाकडून अदा केली जाते. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, जिथे ७ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास करून योजनेला मोठा प्रतिसाद दिला.
ऑगस्ट २०२२ मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेली ही योजना अल्पावधीतच ज्येष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. विभाग नियंत्रक अरुण सियाचे म्हणणे आहे की, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, कारण ही योजना प्रवासास सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.