गडचिरोली,
state-level-volleyball-tournament : नागेपल्ली येथे आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्स स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. विविध राज्यांतील बलाढ्य संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांनंतर लॉयड्स मेटल्स संघाने अंतिम फेरीत बाजी मारत चॅम्पियनचा मान मिळवला.
या स्पर्धेत लॉयड्स मेटल्ससह जबलपूर, खम्मम (तेलंगणा), गडिकुटम (तेलंगणा), चंद्रपूर आणि अमादापल्ली येथील एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे ही स्पर्धा दर्जेदार व्हॉलीबॉल कौशल्य सादर करणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. अंतिम सामन्यात लॉयड्स मेटल्स संघाने जबलपूर संघाचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद निश्चित केले. जबलपूर संघ उपविजेता ठरला, तर चंद्रपूर संघाने तिसरे स्थान मिळवले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी रुख्मिणीदेवी आत्राम होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अवधेशरावबाबा आत्राम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विजेत्या लॉयड्स मेटल्स संघाला 50,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
हा विजय लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीतील खेळाडूंच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि यशस्वी वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. संरचित प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सर्वांगीण क्रीडा विकासावर भर देणार्या अकादमीच्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. नागेपल्लीतील हा विजय खेळाडूंच्या मेहनतीचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि लॉयड्स मेटल्सकडून क्रीडा क्षेत्राला दिल्या जाणार्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा ठोस पुरावा ठरला आहे.