अग्निपुराण!

11 Feb 2026 09:57:41
अग्निपुराण!
agni purana अग्निपुराण हे प्रत्यक्ष अग्निदेवांनी सांगितलेले वेदतुल्य पुराण आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णू काळाग्नी कालरुद्राग्नी रूपाने विराजमान होऊन जे सारभूत तत्त्वज्ञान सांगतात ते अग्निपुराण आहे. ‘‘आग्नेय ही पुराणेस्मिन सर्वा विद्या प्रदर्शिता:’’ यावरून या पुराणात मानवी जीवनाशी निगडित आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक बाबींवर चिंतन आहे हे लक्षात येते. व्यक्तिगत आयुष्यातील सांसारिक रचना, समाजरचना, राजव्यवस्थापन, वास्तू अशा अनेक बाबींच्या आचारसंहिता या अग्निपुराणात आहेत. यालाच सर्वविद्या म्हणतात.
 
 

agnipuran 
 
 
हे पुराण स्वत: अग्निनारायण भगवंतांनी महर्षी वसिष्ठांना सांगितले आहे. म्हणजे या पुराणाचे वक्ता अग्नी आहेत. अग्निदेवता म्हणजे साक्षात विष्णू रूप आहेत. विष्णवे विष्णवे नित्यं विष्णवे नमः। नमामि विष्णुं चित्तस्थमहंकारगतिं हरिम् । हे अग्निपुराण स्वत:च विशद करते. म्हणूनच या पुराणात प्रारंभीच भगवंताच्या मत्स्य, कूर्म, मोहिनी, वराहादी अवतारांचे वर्णन आहे. श्रीरामअवताराच्या सर्व कांडांसह विस्तृत वर्णन तथा श्रीकृष्ण अवताराचे, महाभारताचे संक्षिप्त वर्णन या पुराणात आहे.
विशेष म्हणजे या पुराणात बुद्ध अवतार आणि कल्की अवताराचाही उल्लेख आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्वायंभुव मनुची वंशावळ, कश्यप आणि अदितीचे पुत्र याबाबत माहिती आहे. या पुराणात विविध मुद्रांचे बोटांच्या स्थितीसह अभ्यासनीय संदर्भ आहेत. अंजली, वंदनी, हृदयानुगा मुद्रा अशा विविध अष्टमुद्रा दिल्या आहेत. गुरूंनी शिष्यांना द्यावा तो दीक्षा विधी, मंत्रसाधना विधी सोबत विविध पूजा प्रयोगातील सर्वतोभद्रमंडलादिचे नितांतसुंदर वर्णन इथे आहे.
 
रक्षाकवच असलेले अपामार्जन विधी आणि कुशापामार्जन स्तोत्र याच पुराणात आहे. कुश नावाच्या दर्भापासून बनलेले ‘पवित्र’ बोटात धारण करण्याचा पवित्र धारण विधी, यज्ञ विधी देऊन यज्ञसंस्था या पुराणात दिली आहे. देवालय निर्माण शास्त्र, भूपरिग्रह, वास्तुमंडल, शालिग्राम मूर्ती, विग्रह याबाबत वास्तू विवेचन अग्निपुराणात आहेत. भगवान विष्णूंच्या चार हातातील आयुधांच्या स्थितीनुसार केशव, नारायण अशी चोवीस नावे मूर्तींच्या स्थितीसह या पुराणात आहेत. सूर्यादी ग्रहमंडल, दिक्पाल, चौसष्ट योगिनी प्रतिमा लक्षण यावर चर्चा इथे आहे. शिवलिंग रचनेवर विस्तृत माहिती, प्राणप्रतिष्ठा, अधिवास विधी, प्रतिष्ठापना, विहिरीची पूजा, भवन निर्माण, गृहप्रवेश विधी, देवता प्रतिष्ठा, जीर्णोद्धार विधी यावर माहिती आहे. वास्तुपूजन विधी, द्वार प्रतिष्ठा विधी दिला आहे. नगर रचना शास्त्र हे वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे.
 
या पुराणात गंगा, यमुना, नर्मदा यांचे महत्त्व सोबत काशी, प्रयाग, गया, गया श्राद्ध याबाबत वर्णन आहे. भारताचे सुंदर वर्णन, भूमी विस्तार, मूल्ये सोबतच इथचे ज्योतिषशास्त्र, पंचांग, कालगणना, राशी चक्र, नक्षत्र, कोट चक्र, घात चक्र, सेवा चक्र, राशी बल, त्रिनाडी चक्र, फणीश्वर चक्र अशा विविध ज्योतिष विषयक बाबींचा अभ्यास या पुराणात आहे.
 
काळी विद्या जसे महामारी विद्या, तंत्रविषयक सहा कर्म जसे वश्य, स्तंभन, उच्चाटन, जारण मारण यासंबधात माहिती इथे आहे. विविध तांत्रिक औषधी वनस्पती, शनी राहू, अपराजित मंत्र तथा औषधी वनस्पती अशा बाबींचेही वर्णन आहे. लक्ष तथा कोटी होमात्मक वर्णन, महापातक वर्णन, विभिन्न प्रायश्चित्त, तिथी व्रत वर्णन, शिवरात्री व्रत, अशोक पौर्णिमा व्रत, विविध वार व्रत, विविध नक्षत्र व्रत, विविध मास व्रत, दीपदान व्रत, भीष्म पंचक व्रत, धेनुदान इत्यादी बाबत शास्त्रोक्त माहिती मिळते. संध्या विधी, गायत्री मंत्र विधी यात आहे.
 
राष्ट्राची सुरक्षा, प्रजेकडून घेण्यात येणारी करप्रणाली, राजधर्म पालन, विविध पुरुषार्थ, युद्धनीती अशा राज्यव्यवस्थापन विषयक बाबींवर यावर विवेचन या पुराणात आहे. शुभाशुभ, शकुन, अपशकुन, विविध प्राणी जसे मांजर, घोडा, हत्ती, मुंगूस यांच्या दर्शनावरून होणारे शकुन-अपशकुन अशा बाबी देखील इथे येतात.
 
भगवान श्ररामाची राजनीती, मंत्रबळाने विविध अस्त्र, युद्धसेनेचे सहा भेद आणि बलबलाचे सहा अंग, शस्त्र लक्षण, धनुर्वेद, गदायुद्ध, मल्ल युद्ध, अशा विविध युद्ध प्रकार आणि विविध शस्त्रांचा परिचय या पुराणात आहे. या पुराणात पैतृक संपत्तीचे अधिकारी, स्त्रीधन यापासून सीमा विवाद मग तो गावसीमा किंवा देशसीमा याबाबत नियम आहेत. वेतन, अर्थ व्यवहार दिला इथे आहे. सिद्ध औषधी वर्णन, सर्वरोगहर वनस्पती, विविध औषधी रस, औषधी मंत्र, संजीवनी मंत्र, अश्व चिकित्सा, गज चिकित्सा, सापाचे प्रकार दिले आहेत.
 
शिक्षा निरूपण, नाटक निरूपण, काव्य निरूपण, नऊ रस निरूपण, रीती निरूपण, नृत्य निरूपण, अभिनय आणि अलंकार निरूपण, व्याकरण निरूपण, समास निरूपण, योग निरूपण असे विविध निरूपण या पुराणात दिले आहे.
थोडक्यात, मानवी जीवनाचे कोणतेच अंग या पुराणाने शिल्लक ठेवले नाही.
 
अग्नौ प्रस्थानहुति: सम्यग् आदित्यमुपतिष्ठते ।
आदित्याज्जायते स्त्रीर् वृष्तिर्वृष्टेर्नन्नं ततः प्रजा:।।
 
अग्निपूजनाने दिलेल्या आहुती सूर्यनारायणाला पोचतात. त्यायोगाने पर्जन्य, वर्षावृष्टी होऊन प्रजाजनांना सुख समृद्धी प्राप्त होते.
ॐ महाज्वालाय विद्महे अग्नि मध्याय धीमहि तन्नो: अग्नि प्रचोदयात
अग्निगायत्री आपल्या जीवनावर इष्ट परिणाम करते. खर तर अग्नीचे विविध स्वरूप आहेत. श्रौताग्नी, अलौकिक अग्नी, यज्ञाग्नि,गार्हपत्य अग्नी, दक्षिणाग्नी, आहवनिय अग्नी, वडवाग्नी, जठराग्नी, लौकिक अग्नी असे विविध अग्नी आहेत. जातवेद नावाचा अग्नी हा अरणीमंथनातून यज्ञस्थळी प्रकट होणारा अग्नी आहे. थोडक्यात अग्निभगवान मानव आणि माधव यांना जोडणारा सेतू आहे. अग्निपुराणातील सर्व बाबी याची साक्ष देतात.
प्रा. दिलीप जोशी,वाशीम
Powered By Sangraha 9.0