मुंबई,
Amitabh Bachchan बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली सहा दशके चित्रपटसृष्टीत सक्रिय असून आजही ते तितक्याच उत्साहाने काम करताना दिसतात. मात्र, ते कधी निवृत्त होणार याबाबत चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. या पार्श्वभूमीवर बिग बी यांनी त्यांच्या अलीकडील ब्लॉग पोस्टमधून काम, वेळ आणि आयुष्याविषयीचे विचार मांडताना काही सूचक विधान केले आहे.
मंगळवारी सकाळी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दैनंदिन व्यस्ततेचा उल्लेख केला. “ब्लॉग लिहिण्यासाठी खूप घाई आहे. पण सकाळी लवकर काही मिटिंग्स असल्यामुळे हीच योग्य वेळ आहे. कामाच्या प्रयत्नांना हळूहळू फळ मिळते आणि आशा आहे की कामाच्या वेळेत व्यस्त राहता येते. हे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. कामापासून दूर राहिल्यास नकारात्मक भावना निर्माण होतात, असेही त्यांनी नमूद केले. “कामावर अनुपस्थिती हानिकारक भावना निर्माण करते, म्हणून काम करा, काम करा, काम करा… जोपर्यंत तुम्ही करू शकता,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
अमिताभ बच्चन यांनी Amitabh Bachchan नुकतेच लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७व्या पर्वाचे सूत्रसंचालन पूर्ण केले. या सीझनच्या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणावेळी त्यांनी प्रेक्षकांना भावनिक निरोप दिला. “कधीकधी आपण एखादा क्षण इतका खोलवर जगतो की तो संपताना वाटते, तो आत्ताच सुरू झाला होता. सर्व काही कालच घडल्यासारखे वाटते,” असे सांगताना ते भावूक झाल्याचे दिसले.
या कार्यक्रमाशी असलेले Amitabh Bachchan त्यांचे नाते अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, “मी माझ्या आयुष्याचा एक तृतीयांशपेक्षा जास्त काळ तुम्हा सर्वांसोबत घालवला आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि भाग्य आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे निवृत्तीबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असले तरी, ‘जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत काम करत राहा’ हा त्यांचा संदेश स्पष्ट असल्याचे जाणकारांचे मत आहे.याच्या उत्तरार्धातही कामावरील निष्ठा आणि शिस्त कायम ठेवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा हा दृष्टिकोन त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. निवृत्तीबाबत त्यांनी थेट घोषणा केली नसली तरी, वेळेचे भान ठेवत काम करण्याचा त्यांचा निर्धार मात्र कायम असल्याचे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होते.