शून्य शिक्षकी शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था करूनच समायोजन करा

11 Feb 2026 20:07:08
वर्धा, 
prahar-shikshan-sanstha : पटसंख्येअभावी राज्यातील शेकडो अनुदानित शाळांमध्ये मान्य शिक्षक संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे त्या शाळेत शिकणार्‍या हजारो मुलांच्या शिक्षणाची सोय करूनच समायोजनाची राज्यस्तरीय प्रक्रिया राबवा, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकार्‍यांमार्फत शासनाला केली आहे.
 
 
 
jl
 
 
 
शिक्षण संचालकांनी राज्यस्तरीय शिक्षक समायोजनाचा कार्यक्रम ५ फेब्रुवारी रोजी घोषित केला. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने परीक्षा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांना प्राधान्य द्यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. राज्यातील अनेक शाळांच्या संचमान्यता शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक स्तरावर सुधारणा करण्यासाठी प्रलंबित आहे. ते प्रस्ताव निकाली न काढता सन २०२५-२६ च्या संच मान्यतेच्या आधारे समायोजन प्रक्रिया राबवून घिसाड घाई करणे म्हणजे शिक्षकावर अन्यायकारक आहे.
 
 
सेवा ज्येष्ठतेबाबतचा घोळ सुद्धा राज्यस्तरावर प्रलंबित आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच बालकांचा मोफत व सतीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा भंग होऊन कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची अशी कृती शासनाने करावी मगच समायोजन करावे. सत्र सुरू व्हायला अजून ५-६ महिन्यांचा कालावधी असल्याने घिसाड घाईमध्ये समायोजन प्रक्रिया राबवण्यास प्रहार संघटनेने विरोध दर्शविलेला असून तात्काळ समायोजन प्रक्रिया न थांबविल्यास समायोजन प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
 
 
निवेदन देताना प्रहार शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक नागतोडे, सचिव मुकेश इंगोले, विभाग पदाधिकारी रवींद्र कोठेकर, संतोष महाजन, किशोर ठेंगरे, नरेंद्र ढोरे, सौरभ वाघ, कुंडलिक राठोड, आतिश निंबाळकर, मनीष मारोटकर, शैलेश भोसले, देवदास मडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0