गोंदिया,
gondia-eye-donation : मृत्यू म्हणजे शेवट, अशी सर्वसामान्य धारणा असली तरी गोंदिया जिल्हा मात्र या विचाराला छेद देत आहे. येथे मृत्यूही कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट घडवू शकतो, याची जाणीव समाजमनात दृढ होताना दिसते. अवघ्या सहा तासांच्या आत घेतलेला नेत्रदानाचा निर्णय दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकतो-ही भावना आता जिल्ह्यात घराघरांत पोहोचू लागली आहे.
मागास, आदिवासी बहुल व नक्षलप्रभावित अशी ओळख असलेल्या गोंदियाने नेत्रदानाच्या क्षेत्रात राज्यात उल्लेखनीय ठसा उमटविला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 863 नागरिकांनी मृत्यूपश्चात नेत्रदानाची प्रतिज्ञा केली, तर 33 कुटुंबांनी दुःखाच्या क्षणीही धैर्य दाखवत प्रत्यक्ष नेत्रदानाचा निर्णय घेत अनेकांचे आयुष्य प्रकाशमय केले. ही केवळ आकडेवारी नसून बदलत्या सामाजिक जाणिवेचे प्रतीक म्हणावे लागेल. देशात आजही लाखो नागरिक दृष्टीअभावी अंधारमय जीवन जगत आहेत. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे नेत्ररोपण शक्य झाले असले तरी त्यामागे उभा असतो तो एखाद्या कुटुंबाचा संवेदनशील आणि माणुसकीचा निर्णय.
गोंदियाने या बाबतीत पुढाकार घेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. पालघर, अमरावती आणि कोल्हापूरनंतर गोंदियाचा क्रमांक लागतो, तर पाचव्या स्थानावर यवतमाळ आहे. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमांमुळे अंधश्रद्धा आणि भीती कमी होत असून, ‘मृत्यूनंतरही आपण समाजासाठी उपयोगी पडू शकतो’ ही जाणीव समाजात बळावत असल्याचे दिसून येते. नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही; ती मृत्यूवर मात करणारी माणुसकीची उज्ज्वल परंपरा असून एका निर्णयाने दोन आयुष्यांत प्रकाश निर्माण होऊ शकतो आणि गोंदिया आज हाच प्रकाश पुढे नेत आहे.
नेत्रदानासाठी काय करावे?
गंभीर संसर्गजन्य आजार वगळता कुणीही नेत्रदान करू शकतो. जिवंतपणी नेत्रदानाचे संमतीपत्र भरावे. नोंदणीनंतर ‘डोनर कार्ड’ दिले जाते. मृत्यूनंतर तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. संमतीपत्र नसले तरी नातेवाईक निर्णय घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी केटीएस जिल्हा रुग्णालय, गोंदिया किंवा 9764770320 या क्रमांकावर संपर्क करावा.
अवघ्या 15 मिनिटांचे नेत्रदान अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणू शकते. ही पूर्णपणे सुरक्षित व त्रासमुक्त प्रक्रिया आहे. नागरिकांनी निर्भयपणे नेत्रदानाचा संकल्प करावा.
- डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा शल्यचिकित्सक, गोंदिया
नेत्रदान म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी सर्वात मोठी मानवतादायी देणगी. आपल्या जाण्यानंतरही कोणाच्यातरी आयुष्य उजळवण्याची ही संधी आहे. भावना व अंधश्रद्धेला बळी न पडता नेत्रदानासाठी पुढाकार घ्या.
- भाविका बघेले नागपूरे
नेत्रदान समुपदेशक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया