मुंबई
Nikhil Bhat upcoming film कलेक्टिव स्टुडिओज आणि मॅड मॅन फिल्म्सचा भाग असलेल्या रॅटपॅक स्टोरीजने नव्या प्रोडक्शन भागीदारीची घोषणा केली आहे. या सहकार्याअंतर्गत दोन फिचर चित्रपट संयुक्तपणे विकसित आणि निर्मित केले जाणार असून, त्यांचे दिग्दर्शन निखिल भट्ट आणि साकेत चौधरी करणार आहेत. या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे.
निखिल भट्ट यांच्या ‘किल’ या चित्रपटाला जागतिक स्तरावर मोठी प्रशंसा मिळाली होती. त्याचप्रमाणे साकेत चौधरी ‘हिंदी मीडियम’सारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि आशयघन चित्रपटांसाठी ओळखले जातात. या दोन्ही दिग्दर्शकांची स्वतंत्र शैली आणि दमदार कथाकथन यामुळे आगामी प्रकल्पांविषयी अपेक्षा वाढल्या आहेत.ही भागीदारी मॅड मॅन फिल्म्स आणि रॅटपॅक स्टोरीज यांना एकत्र आणत असून, कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कच्या इकोसिस्टमचेही सहकार्य या प्रकल्पांना लाभणार आहे. दोन्ही चित्रपट सध्या विकासाच्या टप्प्यात असून, वेगवेगळ्या शैलींमध्ये सादर केले जाणार आहेत. दिग्दर्शक-केंद्रित कथानक आणि प्रेक्षकांना प्रभावी थिएटर अनुभव देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ विजय सुब्रमण्यम म्हणाले, “ही भागीदारी कलेक्टिवच्या दीर्घकालीन क्रिएटिव सहकार्याला चालना देणाऱ्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. मॅड मॅन फिल्म्स आणि रॅटपॅक स्टोरीज यांना एकत्र आणून आम्ही महत्त्वाकांक्षी निर्माते आणि चित्रपटकारांना पाठिंबा देत आहोत.”मॅड मॅन फिल्म्सचे संस्थापक मधु मंटेना यांनीही या सहकार्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. “कलेक्टिव ज्या पद्धतीने क्रिएटिव सीमारेषा पुढे नेत आहे, ती अभूतपूर्व आहे. क्षितिजसोबत काम करताना मिळालेला अनुभव अत्यंत समाधानकारक होता. या भागीदारीतून काहीतरी विशेष घडेल, याची मला खात्री आहे,” असे त्यांनी सांगितले.
कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कचे पार्टनर क्षितिज मेहता म्हणाले, “निखिल आणि साकेतसारख्या दिग्दर्शकांसोबत आमचा समान उद्देश म्हणजे प्रेक्षकांशी घट्ट नाते जोडणाऱ्या, धाडसी आणि वेगळ्या ओळखीच्या कथा मोठ्या पडद्यावर आणणे.”या दोन चित्रपटांशी संबंधित कलाकारांची निवड, चित्रीकरणाची वेळापत्रक आणि इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्योगातील दिग्गजांच्या या सहकार्यामुळे आगामी काळात दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.