सेलू,
selu-gram-panchayat-administrator : तालुयात ६२ ग्रामपंचायती असून या आधीच अर्ध्या अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक राज असताना पुन्हा दोन मोठ्या ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने १५ रोजी प्रशासक राज येणार आहे. यात हिंगणी व येळाकेळी ग्रामपंचायतचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी महिला सरपंच आहेत.
हिंगणी येथे दामिनी डेकाटे यांना महिला सरपंच म्हणून दुसर्यांदा जनतेने निवडून दिले होते. येळाकेळी ग्राम पंचायतमध्ये महिला सरपंच म्हणून ५ वर्ष भारती चलाख यांनी गावाचा विकास करण्यावर भर दिला. अजूनही या दोन्ही ग्रामपंचायतला शासन स्तरावरून भरीव निधी मिळाला आहे. पण, गावाच्या विकासाचे स्वप्न पाहत असताना या दोन्ही महिला सरपंचाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा अनेक पुढार्यांना असताना पुन्हा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्याची प्रकिया सुरू झाली असल्याने निवडणूक होणार नाही, असे बोलल्या जात आहे. आता या दोन ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून कुणाची निवड होणार याकडे लक्ष लागले आहे.
या आधीच पंचायत समितीतील अधिकार्यांकडे दोन-दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार देण्यात आला आहे. सध्या दोन विस्तार अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे या दोन गावांच्या विकासासाठी कोण प्रशासक असणार याकडे लक्ष लागले आहे.